वादग्रस्त

माझ्यात दंग आहे, माझ्यात मस्त आहे
भलताच का तरीही मी वादग्रस्त आहे ?

नाही मदार माझी अदृश्य ईश्वरावर
मी नेहमी स्वतःवर ठेवून भिस्त आहे

म्हटलेच जीवनाला अपघात एक जर का
-- तर मी अनेक वर्षे अपघातग्रस्त आहे

बहुतेक सर्व होते नियमास मोडणारे
मी एकटा कदाचित् पाळीत शिस्त आहे

इतक्यात वास्तवा तू, देऊ नकोस हाका
...कवटाळण्यात स्वप्ने मी खूप व्यस्त आहे 

गझल: 

प्रतिसाद

धन्यवाद. या गझलेवरून मला माझ्या एका कवितेची आठवण झाली.
अपघाती मृत्यू सांगा यावा कसा कुणाला
जर जिंदगीच होती अपघात आजवरती
पुरला सिकंदराला खड्ड्यात, हात वरती
एक मृत्यू माणसाला घडवे किती उपरती
कवटाळण्यात स्वप्ने हा सुंदर शेर आहे.
 

या गझलेतील स्वरचिन्ह मतल्यात 'अ' असे घेतले आहे (उदा. मस्त, ग्रस्त). मात्र इतर काही ठिकाणी ते 'इ' असे घेतले आहे (उदा. शिस्त).

गझलेची बाराखडी मध्ये अशाप्रकारे समजाविले आहे....
***मात्र त्यांच्याआधी येणाऱ्या- "ठोकरून" मधील "" या अक्षरात 'वापरून' या यमकामधील "" या अक्षरात आणि पुन्हा "करून" या यमकातील '' या अक्षरात - हटकून "" हा स्वर आलेला आहे. क्वचित 'अ' च्या जागी ऱ्हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर वापरला जातो. परंतु तो अपवाद समजावा.

वर नमूद केल्याप्रमाणे मस्त, ग्रस्त यांबरोबर 'शिस्त', 'भिस्त' हे अपवाद म्हणून स्विकारता येतील का?

हा विषय सोडल्यास भिस्त, अपघातग्रस्त, व्यस्त हे शेर आवडले.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, अजय.
आपण बाराखडी वाचलेली आहे ही सुखद गोष्ट आहे आणि अशा मूलभूत गोष्टींचा संदर्भ देऊन आपण प्रश्न विचारलात, हे उल्लेखनीय. 
बाराखडीमध्ये नमूद केल्यानुसार माझ्या गझलेतील त्या काफियांचा वापर अपवादात्मकच आहे. 'अपवाद म्हणून स्वीकारता येतील का?',  या आपल्या प्रश्नातच उत्तर आहे. 
मी शक्यतो असे अपवाद टाळण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी शेर छान होत असल्यामुळे मोह टाळता येत नाही.

मस्त, ग्रस्त यांबरोबर 'शिस्त', 'भिस्त' हे अपवाद म्हणून  स्वीकारता येतील का?
स्वीकारता येणार नाहीत...अलामत सांभाळायला हवी. नियमाला अपवाद असतो म्हणतात...पण नियमांची शिस्त पाळावी !  :)
बहुतेक सर्व होते नियमास मोडणारे
मी एकटा कदाचित् पाळीत शिस्त आहे
नियम आणि शिस्त यांच्यात किती अंतर असते, याबाबत केदारचा हा शेर बरेच काही सांगून जातो... !  :)
इतक्यात वास्तवा तू, देऊ नकोस हाका
...कवटाळण्यात स्वप्ने मी खूप व्यस्त आहे 

व्यस्त हे यमकही येथे चुकीचे आहे. (मतल्यातील मस्त या यमकाबाबतही हेच म्हणता येईल.)
 सम च्या विरुद्ध जे,  ते व्यस्त; पण व्यग्र (एखाद्या कामात गुंतलेला, गढलेला) या अर्थाने  शेरात तो शब्द वापरण्यात आलेला आहे.  
उदाहरणार्थ ः आयुष्यात सुख आणि दुःख यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. म्हणजेच सम नसते. विषम असते. 
कवटाळण्यात स्वप्ने मी खूप विषम आहे, असे केदारला नक्कीच म्हणायचे नाही...नसणार.  :)

यादगार व प्रदीप,
उहापोहाबद्दल धन्यवाद.

यादगार,
शिसे हा काफिया चालेल परंतु शिस्त हा काफिया चालणार नाही, असे आपले मत आहे. शिसेबाबत आपले मत पटते. ते बाराखडीतच दिलेले आहे.
परंतु, शिस्त हा काफिया का चालणार नाही हे कळले नाही. -हस्व अक्षर आणि जोडाक्षर असलेला शब्द चालणार नाही, हे त्यामागचे कारण आहे का?
कृपया स्पष्ट करावे.
प्रदीप, आपले मत काय आहे ?

प्रदीप,
आपण ओळखल्याप्रमाणे, व्यग्र या अर्थानेच मी व्यस्त शब्द वापरला आहे. व्यग्र हाच मूळचा मराठी शब्द आहे. मराठी व्यस्त चा अर्थ विषम हाच आहे. हिंदी व्यस्तचा अर्थ व्यग्र आहे.
तरीही, शब्द मी वापरला याची कारणे अशी
१. शेर चांगला होत होता. शब्द वापरण्याचा मोह मला टाळता आला नाही.
२. अनेकदा मी मराठी लोकांना असे बोलताना ऐकले आहे की मी कामात व्यस्त आहे. 
     यावरून,  मराठीने व्यस्तचा स्वीकार केला असावा, असे अनुमान काढण्यास वाव आहे. 
३. हे नेहमीच सांगितले जाते की, भाषा प्रवाही आहे. एका भाषेतून दुस-या भाषेत शब्द येतात.   
      त्यामुळे एखादेवेळी असे  शब्द वापरण्यास हरकत नसावी. 
      
     आपण मस्त बाबत जे मत व्यक्त केले आहे, त्याचे आकलन झाले नाही.
      मस्त शब्द मी दंग, रत, मग्न या अर्थाने वापरला आहे. तो मूळचा मराठी नसेलही.
तरीही, तो वापरण्याची कारणे अशी
१. वरील कारणांपैकी क्र.१ चे कारण
२.  वरील कारणांपैकी क्र. ३ चे कारण

     नमूद करू इच्छितो की, शक्यतो मूळ मराठीतील शब्द मी वापरतो. वादविषय होऊ शकतील असे शब्द न वापरण्याकडे माझा कल असतो. क्वचित् तसे घडते.
    
    लेखन करणा-यांमध्ये प्रथमपासूनच फार  पूर्वीपासून दोन िवचारसरणीचे गट आहेत.
१. मूळ मराठी चे आग्रही 
२. थोडे शिथिलीकरण करून इतरही शब्दांचा स्वीकार करणारे.
     या स्थळावरही दोन्ही विचारसरणीचे गट आहेत. दोन्ही गटांची यथेच्छ 'चर्चा' होत असते.(मराठी गझल मनुष्यरूपात आली आणि आपल्या निमित्ताने एवढी चर्चा होत आहे, हे तिला कळले तर लाजून तिच्या गाली गुलाब फुलतील.)
     प्रत्येक गटाला स्वतःचे मत बरोबर वाटते.
     हा वाद अनंत आहे.
     एकुणात, मराठी गझलेत रस घेणा-यांची संख्या वाढत आहे- उद्बोधक चर्चा होत आहेत, हे सुखद आहे. मनात दिलासादायक भावनेचा एक पदर  िनर्माण झाला. 

      सर्वांना धन्यवाद आणि सर्वांचे अभिनंदनही.