इतिहास




मी ही लिहीन म्हणतो सारे जुने नव्याने
संदर्भ भेटले मज आपापल्या कलाने


उकरून काढला मी इतिहास आज थोडा
केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने


डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो
नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने


चुकलेच आज माझे संवाद साधला मी
होईल वाद आता येथे नव्या दमाने


ठाऊक सर्व होते होणार काय आहे!
लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?


नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?
चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने


ओढून बांधले मी अर्थास दावणीला
येतील शब्द त्यांच्या मागून हंबऱ्याने


नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे
होती सताड उघडी गाभ्यात तावदाने


गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा
गुंतू नये कधीही स्वप्नात आंधळ्याने!


आतून येत आहे आवाज हा कुणाचा?
समजूत सांग त्याची काढू तरी कशाने?



गझल: 

प्रतिसाद

ओढून बांधले मी अर्थास दावणीला
येतील शब्द त्यांच्या मागून हंबऱ्याने

नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे
होती सताड उघडी गाभ्यात तावदाने
आवडले...


नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?
चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने

हा शेर फार आवडला!

सगळेच शेर आवडले. मस्त गझल. आभिनंदन!!


उकरून काढला मी इतिहास आज थोडा
केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने
नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे
होती सताड उघडी गाभ्यात तावदाने

गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा
गुंतू नये कधीही स्वप्नात आंधळ्याने!

आतून येत आहे आवाज हा कुणाचा?
समजूत सांग त्याची काढू तरी कशाने?

अप्रतिम शेर !!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

विषय व सादरीकरण नेहमीसारखेच आहे.