गुपित


आरसे का हसू लागले?
चेहरेही फसू लागले


माणसांचे दगड जाहले
गाव कुठले वसू लागले?


उसळले श्वास गात्रांतुनी
ओठ हळवे डसू लागले


गुपित चंद्रास कळले प्रिये
चांदणे रसरसू लागले


मेघ गद्दार झाले पुन्हा
दु:ख धरणी कसू लागले


पिंजर्‍याने दिशा बांधल्या
आत पक्षी बसू लागले!


       (आभाळ)



 



 


 


गझल: 

प्रतिसाद

छोट्या वृत्तातली सुरेख गझल.
माणसांचे दगड जाहले
गाव कुठले वसू लागले?
हा शेर फार आवडला. मक्ताही चांगला. इतर शेर नेहमीच्या कल्पना असल्यातरी छान आहेत. रसरसू मस्त. एक मतला थोडा कमजोर वाटतो.

गझल आवडली.
मेघ गद्दार झाले पुन्हा
दु:ख धरणी कसू लागले
व्वा! मक्ताही मस्त.




मक्ता मस्त आहे. माणसांचे दगडही आवडले. रसरसू मधली कल्पना छान आहे. काही ठिकाणी शब्दांची तारेवरची कसरत होते आहे. ती सुधारता आली तर उत्तम.

गुपित चंद्रास कळले प्रिये
चांदणे रसरसू लागले

शेर आवडला!