...मारव्याचे सूर काही !

...................................................
...मारव्याचे सूर काही !
...................................................


लाभले काही़; तरीही हरवले भरपूर काही !
जवळ येतानाच गेले जे हवे ते दूर काही !


तू तुझ्या वकुबाप्रमाणे बोल जे बोलायचे ते....
येत नाही आणता उसना कधी मगदूर काही !


ओरडा कोणी कितीही - `आग नाही लागलेली`
- सांगतो हा भोवताली दाटलेला धूर काही ! 


- त्याविना होणार नाही पूर्ण ही माझी कहाणी...
ये लिहाया तूच आता शेवटी मजकूर काही !


वाहते आहे अताशा संथ,  तृप्तीने परंतू -
वादळी येऊन गेले या नदीला पूर काही !


रोज हे एकेक बुरखा फाडती येऊन माझा...
चेहरे माझे मला वेडावती भेसूर काही !


पाहिलेली सर्व स्वप्ने का कधी साकार झाली ?
राहिली अधुरीच काही... ! आणि चक्काचूर काही !! 


चांगले नक्कीच काही आज मज सुचणार आहे...
वेगळा माझ्या मनाचा आज आहे नूर काही !


सांजवेळी एकटा होईन मी अगदीच, तेव्हा-
- ठेव तू माझ्याकडे हे मारव्याचे सूर काही !



- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

वाहते आहे अताशा संथ,  तृप्तीने परंतू -
वादळी येऊन गेले या नदीला पूर काही !

रोज हे एकेक बुरखा फाडती येऊन माझा...
चेहरे माझे मला वेडावती भेसूर काही !

वाव्वा.. प्रदीप, अख्खी गझल फार आवडली हे सांगणे न लगे.

यादगार, चित्तरंजन...
हार्दिक प्रतिसादांबद्दल मनापासून आभार...

गझल खूप आवडली. पूर मजकूर आणि मक्ता विशेष

पूर, मजकूर आणि नूर हे शेर विशेष आवडले!! मस्त गझल.

रोज हे एकेक बुरखा फाडती येऊन माझा...
चेहरे माझे मला वेडावती भेसूर काही ! .. हा शेर अतिशय भावला
-मानस६

सोनाली, पुलस्ति, मानस६
हार्दिक प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार...

रोज हे एकेक बुरखा फाडती येऊन माझा...
चेहरे माझे मला वेडावती भेसूर काही !



पाहिलेली सर्व स्वप्ने का कधी साकार झाली ?
राहिली अधुरीच काही... ! आणि चक्काचूर काही !! 

हे दोन शेर विशेष आवडले.