या द्यूतामध्ये कितिदा..

माणूस माणसासाठी आताशा धावत नाही
अन् देवळातला गोटा तर कधीच पावत नाही

झरतील कुणाचे अश्रू, फुलतील सुगंधी बागा
मी उगीच या वाटेवर जखमांना लावत नाही

तळव्याला तुझ्या खुलवते नावांची नाजुक नक्षी
पण मेंदीच्या रंगाचे जगण्याशी भावत नाही

तू कधी मायही माझी, माझी तू कधी प्रियाही
तू फक्त ठोकळ्यामध्ये शब्दांच्या मावत नाही

काचेच्या पाठीमागे ही पक्वान्नांची गर्दी
हे बरे वास घमघमता वार्‍यावर धावत नाही

बापाच्या डोक्यावरती शेणामातीचे डाले
संकोचून रुमाल मीही नाकाला लावत नाही

मी पडतो-झडतो रडतो अन् पुन:पुन्हा धडपडतो
पण कधीच हरण्यासाठी मी शर्यत लावत नाही

या द्यूतामध्ये कितिदा मी स्वतः पणावर चढलो
पण स्वत्व कधी मी माझे डावावर लावत नाही

-गणेश एस. एम.  धामोडकर

गझल: 

प्रतिसाद

सगळेच शेर चांगले आहेत. पहिले ३ आणि शेवटचे २ शेर मस्त आहेत. मतला 'हीट' होईल.

सगळेच शेर आवडले !
मक्ता.. अप्रतिम !

तू कधी मायही माझी, माझी तू कधी प्रियाही
तू फक्त ठोकळ्यामध्ये शब्दांच्या मावत नाही
काचेच्या पाठीमागे ही पक्वान्नांची गर्दी
हे बरे वास घमघमता वार्‍यावर धावत नाही
क्या बात है!!!

सारेच शेर टोकदार आहेत. थेट घुसले.