तसा कुणाला...

तसा कुणाला नाही मी आवडण्याजोगा
कुणाला म्हणू, "माझ्याशी प्रेमाने वागा?"...

हातावरच्या रेषा सगळ्या मिटल्या माझ्या
पायांना का पडल्या इतक्या जखमा-भेगा...

उसवत गेली का मायेची किनार ही?
कळले नाही तुटून गेला केव्हा धागा...

स्वप्नांना मी भिऊन आता झोपत नाही
रात्र-रात्र मी जाळत असतो राहुन जागा...

वसंता, तुझा भरवसा कुठे आहे उरला?
फुलल्या तशाच उजाड झाल्या इथल्या बागा...

आप-मतलबी दुनिया आहे अशी 'अजब' ही;
नको मना तू करूस आता उगाच त्रागा...

गझल: 

प्रतिसाद

कळले नाही तुटून गेला केव्हा धागा... अशी मिसर्‍यात टंकलेखनाची दुरुस्ती.
अजब

तसा कुणाला नाही मी आवडण्याजोगा
कुणाला म्हणू, "माझ्याशी प्रेमाने वागा?"...

हातावरच्या रेषा सगळ्या मिटल्या माझ्या
पायांना का पडल्या इतक्या जखमा-भेगा...

उसवत गेली का मायेची किनार ही?
कळले नाही तुटून गेला केव्हा धागा...हे तीन शेर सहजसुंदर झाले आहेत.  दुसरा तर फारफार आवडला.
रात्र-रात्र मी जागत असतो राहुन जागा...हे काही कळले नाही.

एकंदर गझल आवडली.

शेर फार फार आवडला!! मस्त गझल..

रात्र-रात्र मी जाळत असतो राहुन जागा...
उसवत गेली का मायेची किनार सगळी?...मात्रांच्या हिशोबाने
टंकलेखनाच्या बर्‍यांच चुका झाल्यात, मूळ रचना समोर नसताना आठवून लिहिण्याच्या गडबडीत. क्षमस्व.
अजब

वा वा अजबराव,
अगदी सहज, ओघवती गझल.  सुंदर.
आपला,
(वाचक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com