काय फायदा?


आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?


वेचला मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?


पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?


चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा?


दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?


धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा?


शोधलेस नीट तर तुला मिळेलही
नजर ती न जर तुझ्यात काय फायदा?


ज्यात त्यात पाहतात फायदा सदा
राहुनी अश्या जनात काय फायदा?


तळटीप : वैभव जोशी ह्यांच्या सुचनेनुसार काही बदल करून ही गजल सादर केली आहे.

गझल: 

प्रतिसाद

दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा?
वाव्वा, क्या बात है. अख्खी गझल एकंदरच आवडली.

वेचलास मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?

आणि पहिला शेरदेखील.

वा वा! मिल्या मस्त गझल!
मतला आणि दात हे शेर विशेष आवडले.

'मिल्या'-जुल्या अन्त्ययमकांची गोष्ट...!

मिल्या,
सप्रेम नमस्कार

काय फायदा  ही तुमची गझल वाचली. आवड़ली. ही गझल वाचून मौजही वाटली. आश्चर्यचकितही झालो.  दुसऱयांदा. तसा पहिल्यांदा आश्चर्यचकित झालो होतो, ते तुमची आयुष्य माझे   ही गझल वाचल्यानंतर.  म्हटले, अरे, हे जे कोणी मिल्या (सॉरी हां..., तुमचे खरे नाव माहीत नाही...पण मिल्या हे संबोधन आदरार्थीच आहे, याची खात्री असू द्यावी...) आहेत, ते आपल्या मनात तर दडून बसलेले नाहीत ना...?  किंवा मी त्यांच्या मनात....???
कारण  -  माझ्या व तुमच्या या दोन्ही गझलांमधील (आयुष्य माझे  व काय फायदा)  अन्त्ययमकसाधर्म्य...!
आयुष्य माझे   हेच अन्त्ययमक घेऊन मी एक गझल लिहिली होती...२७ डिसेंबर १९९७ रोजी. दहा वर्षांपूर्वी.  तुमची याच अन्त्ययमकाची गझल १ नोव्हेंबर २००७ रोजी येथे वाचली... आश्चर्यकारक असा हा पहिला योगायोग. तेव्हा मला या अन्त्ययमकसाधर्म्याची गंमत वाटली होती...!  पण त्या वेळी ती मी मनातच ठेवली...( माझी ती गझल मी याच प्रतिसादात पुढे सादर करत आहे...) 
...आणि आता काय फायदा  वाचून दुसऱयांदा नवलात बुडालो...! कारण, याच अन्त्ययमकाची गझल मी येथेच १०  ऑक्टोबर २००७ रोजी सादर केली होती. कदाचित, तुम्ही ती वाचली असेलही...( नसेलही...!). मग मी म्हटले, मिळाला कुणीतरी समानधर्मा आपल्याला...गझल लिहिताना आपल्यासारखीच अन्त्ययमके ज्याला सुचतात असा...!!
आता मी तुमच्या तिसऱया गझलेचीही वाट पाहत आहे...आता कोणते अन्त्ययमक आपल्या दोघांचेही एकसारखेच येते, याची मला खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे... तेव्हा, चालू द्या मिल्या... तुम्हाला शुभेच्छा...!
पुढील (एकसारखे  अन्त्ययमक असलेल्या) गझलेच्या प्रतीक्षेत....!
  .. ............................................... .............................................

माझी ती गझल अशी ः
..............................................

...आयुष्य माझे !

जाहले ओझे मला आयुष्य माझे !
जीवघेणी ही बला आयुष्य माझे !

घेतला आहे कुणी माहीत नाही...
- हा चुकीचा फैसला आयुष्य माझे !

सोबतीला फौज एकाकीपणाची...
एकट्याचा काफला आयु्ष्य माझे !

मी अता मांडू कुठे आरास माझी...?
बाद झालेली कला आयुष्य माझे !!

राहिलो माझाच मी आजन्म कैदी...
ही हवीशी शृंखला आय़ुष्य माझे !

एकही आवाज ऐकू येत नाही...
कोणता हा गल्बला आयुष्य माझे ?

(रचनाकाल ः २७ डिसेंबर १९९७; गालिब द्विशताब्दी प्रारंभ)
  .. ............................................... .............................................

काय फायदा....!! सही गझल... रदीफाची निवड भावली...
पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?.. छान
धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा?.. वास्तववादीच
असेच लिहीत रहा... म्हणजे रसिकांचा 'फायदा' होत राहील..:))
-मानस६

चित्त, पुलस्ती, मानस
प्रोत्साहनाबद्दल खूप धन्यवाद...
प्रदीपजी,
माझ्यासाठी सुद्धा हे एक फ़ार मोट्ठे आश्चर्य आहे आणि आनंदाचा धक्का पण... तुमच्यासारख्यांनी निवडलेली अंत्ययमके मला सुद्धा सुचली ह्याहून अधिक माझ्यासारख्या नवख्याला काय पाहिजे?
खरेच हा फ़ारच आनंददायी योगायोग आहे...
तुमष्य 'आयुष्य माझे' मस्तच आहे...  आता तुमची 'काय फ़ायदा' पण इथे शोधतो आणि वाचतो...
तुमची  'आयुष्य माझे' आधी कधी वाचल्याची शक्यता नव्हतीच... कारण गजल प्रकारात मी अगदीच नविन आहे... गझलेचे तंत्र समजून एक वर्ष सुद्धा झाले नाहीये आणि मंत्र तर अजून शिकतोच आहे...
आणि कृपया माझ्यावर विश्वास ठेवा की हा खरेच योगायोग आहे आणि inspirition किंवा ढापूगिरी दोन्ही नाही... नाहीतर मी तसा उल्लेख नक्की केला असता... अर्थात तुमच्या मेसेज मध्ये तुम्ही असे कुठेच म्हणलेले नाहीये आणि हाच तुमचा मोठ्ठेपणा आहे...
असाच योगायोग मला अजब ह्यांची गजल वाचताना कालच दिसला.. त्यांनी गर्दी अंत्ययमक असलेली एक गजल टाकलेली आहे... दोन आठवड्यापुर्वी मी पण तेच अंत्ययमक घेउन एक गजल लिहिली होती पण मला स्वत:लाच न रुचल्यामुळे बाजूला ठेवून दिली.. विचाराधिन म्हणून :)
आणि कृपया मला 'अहो जाहो' म्हणू नका. अरे तुरे च बरे...
~मिल्या (मिलिंद छत्रे)