मला तुझ्या धर्माची भीती

जगताना मरण्याची भीती
मेल्यावर स्वर्गाची भीती

उघडयावर संसार  मांडला
आता नभ फुटण्याची भीती...

रस्त्याला पायांवर शंका
पायांना रस्त्याची भीती

मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या धर्माची भीती

प्रेमाबद्दल शंका नाही
या चंचल देहाची भीती...

गझल: 

प्रतिसाद

मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या धर्माची भीती

प्रेमाबद्दल शंका नाही
या चंचल देहाची भीती...
व्वा!
मत्ला समजला नाही, तसेच  `रस्त्याला पायांवर शंका'
ही झेपले नाही. कारण माझी आकलन-मर्यादा असावी.

सुरेख गझल आहे. साफसुथरी. सगळेच शेर आवडले पण
-
मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या धर्माची भीती
वावा. फारच आवडला
हा शेर. मस्त.

रस्त्याला पायांवर शंका
पायांना रस्त्याची भीती
हा शेरही फारच आवडला. सुंदर. अर्थ
तसा स्पष्टच आहेसे वाटते. पाय रस्ता चालण्यास असमर्थ असावेत, अशी
रस्त्याला शंका;  तर हा रस्ता मलाभलत्याच ठिकाणी नेतो
आहे की काय अशी पायांना भीती. चू. भू. द्या. घ्या.

अर्थासाठी धन्यवाद चित्तरंजन

उघडयावर संसार  मांडला
आता नभ फुटण्याची भीती...

रस्त्याला पायांवर शंका
पायांना रस्त्याची भीती

मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या धर्माची भीती..शेर आवडलेत
-मानस ६

गझल आवडली. धर्माचा शेर विशेष आवडला!

म्हणतो.
अनंतराव  बरेच दिवसाच्या अंतरा आपली गझल आली.
सुरेख गझल... आवडली.
विश्वास

अनंत,
गझल आवडली. सगळेच शेर कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिल्यासारखे वाटतात.
मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या धर्माची भीती

हा शेर याच कारणासाठी मला आवडला; पण अधर्माची भीती बाळगावी, धर्माची भीती बाळगू नये, हे माझं मत!
- कुमार

मस्त आह्रे.

जगताना मरण्याची भीती
मेल्यावर स्वर्गाची भीती

मला तुझे भय वाटत नाही
मला तुझ्या धर्माची भीती
खरेतर एकुनच मस्त आह्रे.

-सान्जेय

व्वा!! क्या बात है! साधी, सरळ, सोपी आणि प्रभावी गझल!
सर्वच शेर आवडले.
धर्माचा शेर थोडा स्पष्ट हवा होता. वैचारिकदृष्ट्या मला उलटे वाटते. (मला तुझी , तुझ्या धर्मांधतेची, तुझ्या कडवेपणाची  भीती वाटते;  तुझ्या धर्माची नव्हे - कारण) धर्म कुठलाच भयावह नसतो. भयावह असतो तो कडवेपणा आणि धर्मांध दृष्टिकोन ! या शेरातील धर्म म्हणजेच धर्मांधता असा अर्थ घेतला, तरच त्यातील सत्व  / सार पटते. अर्थात, हा फारच व्यक्तिगत दृष्टिकोन झाला. विचाराचे स्वातंत्र्य कवीला आहेच.
गझल सुंदरच आहे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

गझलेच्या शेरामध्ये अर्थाच्या अनेक सम्भावनाना जन्म देण्याची  शक्यता सामावलेली असते.
या शेराच्या अनेक अर्थांपैकी नको तो अर्थ आपण घेतलेला दिसतोय !
धर्म हा इथे विचारधारा ,स्वभाव या दोन अर्थांनी  प्रयुक्त केलाय असे समजुन पुन्हा शेर वाचावा !
गझलेचा शेर एक संपुर्ण संकुल असतो हे विसरून चालणार नाही. सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार !

अनंतशेठ..
केवळ अप्रतिम गझल..सरळ साधी पण अनेक अर्थांनी सजलेली..सुरेख..

नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
(आपला चाहता) केशवसुमार.

कृपया, माझा प्रतिसादही समजून घ्यावा. विशेषतः
'या शेरातील धर्म म्हणजेच धर्मांधता असा अर्थ घेतला, तरच त्यातील सत्व  / सार पटते.'हे वाक्य. आपण म्हणता तेच मीही म्हणतो आहे, हे लक्षात येईल. माझ्या मताची पडताळणी आपण इतरांशीही चर्चा करून घेवू शकता. असो. एखाद्या गोष्टीवर अधिक बोट ठेवण्यापेक्षा एकूण गझलेबद्दलचे मत मह्त्वाचे मानावे. मला असं वाटतं, कुमारांचही मत तेच आहे.
चूभूद्याघ्या. बाकी काय चाललं आहे? कसे आहात?
संतोष
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

अनंतना पाठवलेल्या प्रतिसादाची प्रत. आपले मत माझ्या मताप्रमाणे आहे असे वाटले म्हणून.
कृपया, माझा प्रतिसादही समजून घ्यावा. विशेषतः
'या शेरातील धर्म म्हणजेच धर्मांधता असा अर्थ घेतला, तरच त्यातील सत्व  / सार पटते.'हे वाक्य. आपण म्हणता तेच मीही म्हणतो आहे, हे लक्षात येईल. माझ्या मताची पडताळणी आपण इतरांशीही चर्चा करून घेवू शकता. असो. एखाद्या गोष्टीवर अधिक बोट ठेवण्यापेक्षा एकूण गझलेबद्दलचे मत मह्त्वाचे मानावे. मला असं वाटतं, कुमारांचही मत तेच आहे.
चूभूद्याघ्या. बाकी काय चाललं आहे? कसे आहात?
संतोष
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

गजल आवडली. सग़ळे शेर आवडले.आता नभ फुटण्याची भीती...हा मिसरा फार आवडला. (माझ्या एका गजलेत मी एक शेर असा लिहिला होता- आकाश फाटल्यावर कोणास हाक मारू? हे ईश्वरा तुझा का लागेल ठाव आता...)
अजब

रस्त्याला पायांवर शंका
पायांना रस्त्याची भीती

प्रेमाबद्दल शंका नाही
या चंचल देहाची भीती...

ओहोहो! फारच सुंदर.

जगताना मरण्याची भीती
मेल्यावर स्वर्गाची भीती

यातला अर्थ काही वेगळाच जाणवला. पण कविवर्य, आपल्याला नक्की काय अभिप्रेत आहे? ते कळाले तर बरे.

आपल्या गझला खूपच ताज्या/नाविन्यपूर्ण असतात. अशा गझलांसाठी आभार.
ही थोड्या उशीराच वाचनात आली. क्षमस्व!

सगळेच शेर फार आवडले. मतला, ३ आणि शेवटचा शेर विशेष आवडला.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

ढवळेसाहेब,
ग्रेट. मान गये. गझल अशी पाहिजे. अत्यंत कमी शब्दात प्रचंड आशय. वाचताना काय मजा आली? मान गये.