अमल

खूप दिवसांनी भिजू सोन्यात चल
पसरला गावावरी पिवळा अमल

हात एकच मार स्थित्यंतर घडव
फार झाले तेच ते छुटपुट बदल

सर्व पुंजी फुंकुनी आलास पण
वाटली कोठे तुला खर्चिक सहल

आक्रमण कर आणि हो की मोकळा
युद्धनीतीवर किती करतोस खल

जिंकला कोणी कसा शिकणे नको
तो कसा स्पर्धेत ह्याचे कर नवल

निग्रहाने सोड इवला खंड हा
वाट पाहू लागले मोठे प्रतल
-------
विजय दिनकर पाटील

गझल: 

प्रतिसाद

'प्रतल' मस्त आहे. 'छुटपुट बदल'ही. "तो कसा स्पर्धेत ह्याचे कर नवल" :)

........खूप दिवसांनी भिजू सोन्यात चल

गझल आवडली . पण सोन्यात भिजण्याची कल्पना वस्तुस्थितीदर्शक वाटत नाही.

बाळ पाटील,

धन्यवाद!

आपल्याकडे 'पैशाची आंघोळ घालणे' 'पैशाचा पाऊस पडणे' असे वाक्प्रचार आहेत त्याबद्दल आपले काय मत आहे?

पैशाऐवजी मी सोन्याचा विचार केला, आणि आंघोळ करताना किंवा पाऊस पडताना भिजणे अपरिहार्य आहे!

आपल्याकडे 'पैशाची आंघोळ घालणे' 'पैशाचा पाऊस पडणे' असे वाक्प्रचार आहेत त्याबद्दल आपले काय मत आहे?
................ पण 'सोन्याची आंघोळ घालणे' असा वाक्प्रचार नाही. इथे सोने हा केवळ धातु आहे. सोन्याची नाणी समजू शकत होते, असो.