तुझी आभाळपुण्याई तुकोबा

नको टांगूस माझी लक्तरे ही
जगाला सांगतिल सगळे खरे ही

सयी सांभाळणारे पूर होते
'तशी'.. काठावरी काही घरेही

पुन्हा गोठ्यात हंबरतील गाई
पुन्हा लाडात येतिल वासरेही

जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही

जरासे मौन घे आकाशगंगे
(किती वाचाळ आहे बापरे ही !)

निघू शतपावलीला सोबतीने
पहा मिटतील सारी अंतरे ही

दिशांनो द्या जरा ओढाळ हाका
पुढे जातील माझी पाखरे ही

असावी ही खरी किमया जिभेची
तुझी गोडी नसावी साखरे ही

तुझी आभाळपुण्याई तुकोबा
जळावरती तुझी गाथा तरे .. ही....

गझल: 

प्रतिसाद

मतल्यातल्या ओळींचा क्रम बदलून वाचून पाहिले. अधिक प्रभावी वाटले.

(किती वाचाळ आहे बापरे ही !)
हाहाहा. वरची ओळ साजेशी वाटली नाही.

पुन्हा गोठ्यात हंबरतील गाई
पुन्हा लाडात येतिल वासरेही

जरा हासून बघ ह्या वेदनेला
पुन्हा येणारही नाही बरे ही
वा. वरील दोन्ही शेर आवडले.

एकंदर छान आहे गझल. काही शेर धूसर वाटले.

सयी सांभाळणारे पूर होते
'तशी'.. काठावरी काही घरेही
वा

छान गझल

धन्यवाद चित्तरंजनजी , कणखरजी

चित्तरंजनजी विशेष आभार .आपले मत पटते आहे . शेर करतानाच ही बाब माझ्या लक्षात येत होती पण बदलही सुचले नाहीत नेमके . आणि एकदा शेर झालेत म्हटल्यावर प्रकाशित केल्यावाचून राहवत नाही मला ते शेर वगळणे हेही जिवावर येते जणू
पण असो पुढील वेळी खबरदारी घेइन नक्की

तूर्तास एक माझा शेर आठवला (ह्या रचनेस पूर्णपणे लागू होणार नाही तसा पण तरीही ..)

होत असतानाच कळते
ही गझल बेकार आहे

धन्यवाद . लोभ असावा
आपला नम्र
वैवकु

सयी सांभाळणारे पूर होते
'तशी'.. काठावरी काही घरेही

छान.

धन्यवाद केदारजी

आवडली गझल.

मतलाही....
आणि
उलटा करूनही