नेहमी गर्दी तुला जी लागते

वर्षभर दुथडी भरूनी वाहते....
ही नदी कोठून पाणी आणते?

वाळवंटावर मनाच्या वाढते
आठवांचे रोप कोणी लावते...

कुंपणावरतीच आहे बहरते
वेलही लाचार झाली वाटते

वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
अन् ढगाला कोसळावे लागते!

नेहमी गर्दी तुला जी लागते
केवढी माणूसघाणी वागते!

जयदीप

गझल: 

प्रतिसाद

छान. ४ था शेर आणखी चांगला बांधता आला असता बहुधा. शुभेच्छा.
( प्रतिसाद दुरुस्त केला आहे. आधी चुकून ३ रा शेर असे लिहिले होते.)

धन्यवाद सर :)

प्रयत्न करतो

>> वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
अन् ढगाला कोसळावे लागते!
यात कुठेशी (कुठे + अशी ) हा शब्द स्त्रीलिन्गी असल्याचा बोध करतो. जीवन या शब्दाशी तो निगडीत असल्याने जीवनाचा पाणी हा अर्थ घेतला तरी त्यासाठी नपुसकलिंगी " कुठेसे " हा शब्द योजायला हवा होता. हे सांगण्याचा प्रांजळ उद्देश केवळ तन्त्रशुध्द्ता यावी , गझल आणखी बहरावी हा आहे.एरवी मी ही आपल्याच रांगेतील आहे.

माफ करा , थोडे आणखी बोलायचे होते. माझ्या वरील प्रतिसादाबाबत जर आपण म्हणाल की कुठेशी हा शब्द नदीसाठी आला आहे. पण मग , पहील्या शेरात आहे तसा नदीचा निर्देश इथे नाही, मग तो पहील्या शेराच्या अनुषंगाने घ्यायचा का ? विश्वस्तांना विनंती की, आपण याबाबत थोडे मार्गदर्शन कराल,
जेणेकरून गझल आकलनास मदत होईल.काही चुकलो असेल तर क्षमाही कराल.

वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
वरच्या ओळीबाबत बाळ पाटील ह्यांनी मांडलेला मुद्दा योग्य वाटतो आहे.

वाहणे या क्रियेशी संबंध असल्याने कुठेशी वापरले आहे.
काही चुकले असल्यास सांगावे.

:)

जयदीप,

'कुठेशी' खटकत आहेच.

वाहणे ही क्रीया असली तरी तुझा मुद्दा लक्षात आला नाही. थांबणारे काय आहे ह्याला महत्त्व आहे त्यामुळे 'ते' जीवन की 'ती' जीवन इतकाच प्रश्न असावा माझ्या मते.

असो, तुझा काही वेगळा मुद्दा असल्यास सविस्तर लिहिलेस तर बरे!

प्रयत्न करतो:
१. "वाहते जीवन ..." असे लिहिले असते तर पुढे "कुठेसे थांबते" असे आले असते
२. "वाहणे जीवन": ही क्रिया थांबते एका ठिकाणी.. म्हणून "कुठेशी" वापरले होते
जीवन : जगणे/पाणी/अश्रू

मुद्दा क्र. २ अजूनही लक्षात येत नाहीये.

वाहणे जीवन ह्यात 'वाहत राहणे म्हणजेच जीवन' असे म्हणायचे आहे का?

तसे असल्यास 'वाहणे जीवन....कुठेशी('कुठेसे' असे लिहिले तरी) थांबते' ह्या ओळीचा नेमका अर्थ काय? किंवा

वाहत राहण्याची ही प्रक्रीया कुठेतरी थांबते असे म्हणायचे आहे? तसे असल्यास मग ओळ हवी तितकी स्पष्ट आणि स्वच्छ आलेली नाही.

ओळ गोंधळवणारी आहे नक्कीच!

फार कीस पाडत आहे असे वाटत असल्यास सांग, थांबतो. :)

मतला मात्र मला फार आवडलेला आहे.

वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
अन् ढगाला कोसळावे लागते!

सुंदर शेर!

वाहणेचा येथील अर्थ 'टू फ्लो' असा नसून 'टू बेअर' असा आहे. म्हणजे वजन उचलणे (भार सोसणे) असा आहे. जीवन म्हणजे पाणी! ढगाने पाण्याचा भार सोसणे कोठेतरी थांबते आणि मग त्याला कोसळावेच लागते.

अतिशय अर्थपूर्ण शेर आहे.

अभिनंदन!

मुद्दा 'कुठेशी' ह्या शब्दाच्या वापराबाबतचा आहे. शेराचा अर्थ जयदीपला काय अपेक्षित आहे हे महत्त्वाचे!

सर,
आयुष्यात बरेच वेळा लहान मोठे दुःखी करणारे प्रसंग येत असतात (लहान डोंगर /मोठे डोंगर)...

ढग...आपण..आपल्यातला खंबीरपणा...जरी एखाद्या गोष्टी ने खूप दुःख्खी झालो असलो...तरीही रडत नाही.... अशावेळी लहान डोंगर सहज पार होतात.. ढग ..आपण..त्यावरून निघून जातो...पण काही मोठी दुःखे ...मोठे डोंगर... तिथे जाऊन खंबीरपणा संपतो...पुढे जायची इच्छा असूनही..थांबावे लागते...आणि डोळे पाणावतात..

इथे जीवन (अश्रू आणि जगणे) या अर्थाने वापरले आहे...

"वाहणे जीवन" ही क्रिया: जीवनाचा भार वाहणे असे आहे...

म्हणून कुठेशी वापरले आहे

धन्यवाद :)

बेफिजी : विशेष आभार..मला इतक्या कमी शब्दात इतके चांगले स्पष्टीकरण देता आले नसते
:)

कुठेशी हा शब्द म्हणजे 'कुठेशीक' ह्या आताशा वापरातून लोप पावत चाललेल्या मराठी शब्दाचे आधुनिक म्हणावे असे रूप आहे (एकाअर्थी अपभ्रंशच आहे हा ). असे शब्द अनेकदा कोठेतरी ऐकले गेले असतात वाचले गेले असतात आणि आपल्या मनात राहून गेले असतात कधी कविता करताना असे शब्द अनेकदा कामी येतीत किंवा आपल्या पद्धतीने त्यांचे स्वरूप बदलून आपल्याकडून ते वापरले जातात आपसूकच.( मे बी फॉर वृत्त वगैरे )
आणि गम्मत म्हणजे ते कुठून आले असेच का आले हे आपल्यालाही समजत नाही .

जोशी बाकीच्या वादात पडू नका तुमची काही चूकच नाही झालेली

कुठेशीक म्हणजे कुठेतरी हा अर्थ मला माहीत आहे .

धन्यवाद

कुठेशी हा शब्द म्हणजे 'कुठेशीक' ह्या आताशा वापरातून लोप पावत चाललेल्या मराठी शब्दाचे आधुनिक म्हणावे असे रूप आहे (एकाअर्थी अपभ्रंशच आहे हा ). असे शब्द अनेकदा कोठेतरी ऐकले गेले असतात वाचले गेले असतात आणि आपल्या मनात राहून गेले असतात कधी कविता करताना असे शब्द अनेकदा कामी येतीत किंवा आपल्या पद्धतीने त्यांचे स्वरूप बदलून आपल्याकडून ते वापरले जातात आपसूकच.( मे बी फॉर वृत्त वगैरे )
आणि गम्मत म्हणजे ते कुठून आले असेच का आले हे आपल्यालाही समजत नाही .

जोशी बाकीच्या वादात पडू नका तुमची काही चूकच नाही झालेली

कुठेशीक म्हणजे कुठेतरी हा अर्थ मला माहीत आहे .

धन्यवाद

वाहणे जीवन....कुठेशी थांबते...
पुन्हा विचार केल्यावर 'कुठेशी' योग्य वाटते आहे. 'आता कुठेशी माझे *** झाले आहे' वगैरे छाप वाक्ये कानी पडतात. त्यात चुकीचे वा गैर नाही. मात्र, 'कुठेशी' हा शब्द मला खटकला. वरच्या ओळीची एकंदरच रचना खटकण्याचे कारण 'कुठेशी' ह्या शब्दाच्या होऊ शकत असलेल्या फोडीशी आणि आधी आलेल्या 'वाहणे' आणि नंतर आलेल्या 'थांबणे' ह्या क्रियापदांशी निगडित आहे. मी आधी देणार होतो. पण रसभंग करणारे वाटेल म्हणून टाकले. बाकी चर्चा छानच.