तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

हवा आनंदली थोडी विखारी गारवे गेले
तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

जसे सांगीतले मी वाट गझलेची निवडल्याचे
तसे वाटेतुनी माझ्या सुखांचे हायवे गेले

तुझा अंधार झाल्याचे मला कळले कसे नाही
किती चमकून अत्ता आठवांचे काजवे गेले

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

जगाने फार शंकावून माझी तोलली भक्ती
जगाचे पार कामातून सारे ताजवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

किनारे पश्चिमेचे बोलवत होते अश्यावेळी
न जाणे का उगवतीच्या दिशेला नाखवे गेले

तुला भेटावयाचा आजसुद्धा मूड झालेला
मनाचे मूढ मांजर आजसुद्धा आडवे गेले

विनवले चंद्र्भागेला..जरा भिजवून जा.. तेव्हा
शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले

खुळ्या आशेवरी केल्या किती आषाढवार्‍या मी
कुठे झरला तुझा श्रावण हजारो भादवे गेले

~वैवकु

गझल: 

प्रतिसाद

गझल वाचून तुम्हाला गझलेच तंत्र बऱ्यापैकी जमलेले आहे असे दिसते. यमके वगैरे छान निभवली आहेत. 'तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले' ही ओळ मस्त आहे. वरची ओळ आणखी छान होऊ शकली असती असे वाटून गेले. 'इच्छांचे थवे'ही आवडले.

धन्यवाद चित्तरंजनजी
आपण केवळ गझलेच्या तांत्रिकतेचा उल्लेख केलात आता आपल्या एकंदर प्रतिसादावरून ही गझल एकतर आपल्या पसंतीस उतरली नसावी किंवा असतानाच ही निकॄष्ट / हीन दर्जाची असावी असे जाणवले. ही कुणाला आवडेल की नाही अशी शंका आता मला येत आहे . मला वाटलेले की ही रचना लोकांना आवडेल म्हणून
ह्या रचनेतील बव्हंशी शेर यमके आधी निश्चित करून मी केले आहेत हे मला मान्य आहे .

चूक भूल द्यावी घ्यावी ही प्रार्थना

धन्यवाद सर

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

तुला भेटावयाचा आजसुद्धा मूड झालेला
मनाचे मूढ मांजर आजसुद्धा आडवे गेले

विनवले चंद्र्भागेला..जरा भिजवून जा.. तेव्हा
शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले

खुळ्या आशेवरी केल्या किती आषाढवार्‍या मी
कुठे झरला तुझा श्रावण हजारो भादवे गेले

He sher faar aavadale.

शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले

This line is too good.

(One should take feedback as an opportunity to further in the field, according to me.)

Good luck.

आपण केवळ गझलेच्या तांत्रिकतेचा उल्लेख केलात आता आपल्या एकंदर प्रतिसादावरून ही गझल एकतर आपल्या पसंतीस उतरली नसावी >> असे नाही. आपण ह्याहून चांगले लिहू शकता एव्हढेच. एव्हढे मनावर घेऊ नका. तुम्ही छानच लिहिता. आणि मीही सर्वज्ञानी नाही.

तुझा अंधार झाल्याचे मला कळले कसे नाही
किती चमकून अत्ता आठवांचे काजवे गेले

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

हे आवडले. इच्छांचे थवे जास्त आवडला

जगाने फार शंकावून माझी तोलली भक्ती
जगाचे पार कामातून सारे ताजवे गेले

खूप आवडला असे नाही पण छान आहे, सादरीकरण वेगळे आहे.

गझल छान.

मात्र, इंग्रजी शब्द म्हणजे हायवे, मूड हे मराठी गझलेत टाळावेत असे वाटते.

थवे, जानवे, आडवे, कालवे, भादवे अत्तिशय आवडले.

एकंदरीत गझलही.

धन्यवाद !

सर्वांचे मनःपूर्वक आभार

Anek sher aavadale. pudhil vishesh bhavla.

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

Shubhechchha !!!

Thanks Vaibhav

तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले
एकाच ओळीत कमी मात्रा पण अक्षरे जास्त असलेले दोन शब्द आले की गझलेची लय बिघडते, हा माझा अनुभव आहे. येथेही घन आणि बरसून या दोन शब्दामुळे असे घडल्याचे प्रत्ययास येते. गझल आवडलीच.

गझल आवडली...

धन्यवाद बाळ जी
धन्स डॉ. साहेब

बाळ पाटील जी मला आपला मुद्दा लक्षात आला आहे पण मला इतके परफेक्ट तंत्रशुद्ध लिहीता येत नाही . मी प्रयत्न केला होता पण मग मला हवंतसं लिहिता येत नाही आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी नाद सोडला .आता मला तसाही इतके परफेक्ट लिहायचा विचार शिवतही नाही मनाला मला जमेल तितकेच मी ह्या बाबतीत करू शकतो ह्या माझ्या लिमिटेशनची मला जाणीव आहे . पात्रताच म्हणा ना !

असो मला माझा एक शेर आठवला ह्यावरून..

मीच राखतो थोडे हातचे असे काही
शेर छान झाला की वेदना प्रखर होते

धन्यवाद पाटील जी लोभ असावा

आपण सारे छान लिहिता म्हणूनच माझ्यासारखा रसिक मनाचा वाचक इथे टिचकि मारतो. रसिक मनाची भूक फार मोठी असते. एखादी बाब खटकली की तो बोलून मोकळा होतो. आणि हो ! रसिकाला कशाला हवी डॉक्टरेट ! माझ्यासारख्यास ना हर्ष ना खेद. असो , मलाही माझा एक शेर आठवला ह्यावरून..
हे दु:ख काय मजला भेव घाली
नाहीतरी सुखाला कोलतो मी
धन्यवाद !!

वा बाळ जी छान शेर
धन्यवाद