तीच भेटावी..
खालील रचना या साईटवर प्रकाशित केलेली होती. काही दिवसांनी ती वाचताना काही बदल केले व नवी गझल तयार केली. काही शेर जसेच्या तसे आहेत. येथील नव्या व जुन्या सदस्यांसाठी दोन्ही रचना देत आहे.
जुनी प्रकाशित रचना
शेकडो होती तुला मी धाडली पत्रे
सांग, त्यापैकी किती तुज भेटली पत्रे
कागदावर आसवे उबदार पडली अन्
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे
एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे
वाकडा माझा नसावा शब्द यासाठी
बारकाईने स्वतःची वाचली पत्रे
अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे
नवी रचना
तीच भेटावी, तशी ती भेटली पत्रे
सर्व काही समजले, ती बोलली पत्रे
आसवे उबदार पडली कागदावरती
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे
एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे
अर्थ कळला आज माझ्या भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे
ऐकुनी घेतात माझ्या भावना सा-या
नेहमी होती सखीसम भासली पत्रे
प्रतिसाद
वैभव वसंतराव कु...
गुरु, 07/08/2014 - 21:05
Permalink
जुनी रचना अधिक आवडली तिचा
जुनी रचना अधिक आवडली तिचा मतला जरा कमी आवड्ला तरी नव्या रचनेच्या मतल्यापेक्षा बरा वाटला
वाढीव शेर मी असा करून वाचला (क्षमस्व परवानगीन घेतल्याबद्दल ... )
घेतल्या ऐकून नुसत्या ...भावना माझ्या
नेहमी माझ्या सखीसम वागली पत्रे
मला आपल्या मूळ शेरात दोनही ओळीत काळ बदलत असल्याचे दिसले म्हणून बदल करावा वाटला
असो
वाकडा माझा नसावा शब्द यासाठी
बारकाईने स्वतःची वाचली पत्रे
.......छानच आहे की हा शेर . वगळावा असा नाही वाटला मलातरी
अजून एका गोष्टीसाठी क्षमस्व की आपली माझी प्रत्यक्ष ओळख अजिबातच नाही किंवा आपल्या गझलचीही फारशी ओळख मला नाही तरी आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात ही बाब मला जाणवत असूनही आपल्याशी संवाद साधताना ती बाब मी विचारात घेत नाही (की मी आपल्यासमोर अनोळखी असेनच पण नवखाही असेन ) अश्या वेळी दिलेले माझे प्रतिसाद देणे आपणास कोठेही खटकले तर कृपया हक्काने तसे सांगावे ही विनंती
आपला नम्र
~वैवकु
बेफिकीर
शुक्र, 08/08/2014 - 09:52
Permalink
अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे
केदार पाटणकर
शुक्र, 08/08/2014 - 09:54
Permalink
वैभव,
वैभव,
तुझ्या प्रतिसादाचे स्वागत.
अरे, फार नाही, आपल्यात जास्तीत जास्त पंधरा वर्षांचा फरक असेल. मोकळेपणाने प्रतिसाद देत जा. तू बदललेली ओळही खास आहे. खट्याळ आहे. काळाचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.
तुझी एक 'अजून काही' रदीफ असलेली गझल आठवते. ठिकाणे अजून काही...असा शेवट असलेला शेर आठवतो. तुझीच आहे ना ती गझल ?
वैभव वसंतराव कु...
शुक्र, 08/08/2014 - 20:20
Permalink
ठिकाणे अजून काही..... केदारजी
ठिकाणे अजून काही..... केदारजी ती मझी गझल नाही ती विशाल कुलकर्णीची गझल आहे
धन्यवाद