जन्म एक मध्यरात्र वाटतो

जन्म एक मध्यरात्र वाटतो
मग तुला स्मरून मी पहाटतो

ज्यापुढे उडून दाखवायचे
तोच आपला पतंग काटतो

ती मला बघून उर्दुळाळते
अन् तिला बघून मी मर्‍हाटतो

हा नको म्हणूस फक्त ओंडका
एक ओंडकाच जग कलाटतो

मी सडाफटिंग राहतो जगी
मी मनामधे कुटुंब थाटतो

राखली किती कसून गुप्तता
आपला विषय तरी चव्हाटतो

बांध फाटके किती शिवायचे
रोज पापण्यांत पूर दाटतो

विठ्ठला पुन्हा मला झपाट तू
आणि मी पुन्हा तुला झपाटतो

~ वैवकु :)

गझल: 

प्रतिसाद

ज्यापुढे उडून दाखवायचे
तोच आपला पतंग काटतो
वाव्वा. मस्त. मतला, सडाफटिंग, चव्हाटतो हे शेरही मस्त. एकंदरच आवडली वैभव.

अंत:करणपूर्वक धन्यवाद चित्तरंजनजी
'सुरेशभट . इन' वर रचना प्रकाशित होणे खूप अभिमानास्पद आहे माझ्यासाठी !
पुनश्च धन्यवाद

एकूण गझल खूप आवडली.

पहाटतो, उर्दुळाळते, मर्‍हाटतो, चव्हाटतो हे सगळे प्रयोग आवडले. असे प्रयोग व्हायला हवेत. सडाफटिंग या शब्दाचा वापर चपखल. तो शेरही छान.

केदारजी धन्यवाद
असाच लोभ असूद्यावा ही प्रार्थना .......

Masta masta

हा नको म्हणूस फक्त ओंडका
एक ओंडकाच जग कलाटतो

क्या बात!
एकंदरीत चांगली गझल.

धन्यवाद बेफीजी मुटेसर धन्यवाद