ज्योत छोटीशी जरी.. रसग्रहण

मित्रहो, वैभव देशमुख यांच्या ज्योत छोटीशी जरी...या आणखी एका गझलेचे रसग्रहण सादर करीत आहे.

ज्योत छोटीशी जरी आहोत आपण
घाव काळोखावरी आहोत आपण
- लहानशा ज्योतीनेही अंधार कणभर का होईना, दूर होऊ शकतो ही पारंपरीक कल्पनाच कवीने मांडलेली आहे पण नावीन्यपूर्ण ढंगात मांडलेली आहे. पेटलेली प्रत्येक ज्योत ही केवळ ज्योत नसून तो काळोखावर केलेला हल्ला आहे, असा नवा विचार कवी देत आहे. ज्योत ही काळोखावरचा घाव आहे, असे सुचवून कवीने ज्योतीच्या प्रतिमेला धार दिलेली आहे. ज्योत नुसतीच शांत, मिळमिळीत नसून ती अंधारावर त्वेषाने हल्ला करण्याची कुवत राखून असते,
असे कवी सुचवत आहे. घाव हा सहसा टणक वस्तूवर घातला जातो आणि तोही एखादी कल्पित प्रतिमा घडविण्याच्या उद्देशाने. उदा. पाथरवटांचे दगडातून मूर्ती घडवणे. ज्योतीला एकवेळ स्पर्श करता येईल पण अंधार अस्पर्शित असतो. त्याला आकारही नसतो. कवी ज्योतीला तर नवप्रतिमा बहाल करतोच करतो; शिवाय, अंधारावर टणकपणाचे आरोपण करून वाचकांना विचार करायला लावतो.
ज्योतीचे मवाळपण निघून जाऊन तिला जे जहालपद मिळते, त्यामुळेच शेर उल्लेखनीय ठरतो. चाकोरीबध्द संकेतांना नवे परिमाण देण्याचे कार्य या शेरात यशस्वी झालेले आहे.

बोलली ती अन्‌ मला वाटून गेले
वेगळे कोणीतरी आहोत आपण
- प्रेमात पडू पाहणा-यांना ती आपल्याशी बोलेल की नाही, हा प्रश्न छळत असतो. अनेकांना खात्री असते की, ती बोलणारच नाही. आपण पामर. (असाहित्यिक शब्द - फालतू) त्यामुळे तिने आपल्याशी बोलण्याचे काही कारणच
नाही, अशी साधारण भावना असते पण काही जणांना एखादा सुखद धक्का बसतो....ती बोलते. बोलल्यानंतर एकदम त्या होतकरू प्रियकराला वाटू लागते की, आपण स्वतःला इतके कमी समजण्याचे कारण नाही. स्वतःच्या मनात प्रियकराची उंची एकदम वाढते आणि त्याला वाटू लागते की, आपल्यालाही काही एक किंमत आहे आणि एकदम त्याची दुनिया बदलून जाते. एरवी माणसाशी हजारो लोक बोलतात पण त्यामुळे वेगळे कोणीतरी असण्याची जाणीव होत नाही. आवडणारी मुलगी बोलली तर मात्र प्रियकर प्रीतीच्या दुनियेतला, स्वतःपुरता का होईना, सम्राट होऊन जातो.
एक गोड प्रणयसंकेत देणारा शेर.

आपले सोयरसुतक आहे कुणाला ?
सारखे दारी-घरी आहोत आपण
- ज्यांचे अस्तित्व सतत भोवताली असते, त्यांना किंमत नसते. जे दुर्मीळ असतात, त्यांना किंमत मिळते हा अनुभव प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी आलेला असतो. तोच अनुभव कवीने मांडलेला आहे. येथे किंमत, महत्त्व हे शब्द नाहीत; सोयरसुतक हे शब्द आहेत, हा जरा वेगळेपणा आहे. जो माणूस सततच घरीदारी दिसतो, असतो, कामे करतो त्याला किंमत कमी मिळते. क्वचित त्याचा अपमानही होऊ शकतो. तो नसताना त्याची किंमत उमगते. कवी स्वतःबद्दल बोलत आहे, असा एक अर्थ निघतो. आपल्या सगळ्यांबद्दल
बोलत आहे असा दुसरा अर्थ निघतो. अर्थाच्या तिस-या पातळीवर कवी धोक्याची घंटा वाजवतो. पहा बुवा, सारखे दिसत राहिलात तर तुम्हाला किंमत मिळणार नाही असा इशारा देतो.
पारंपरिक कल्पना असलेला शेर.

एक वारा भेटला, माहीत झाले -
एक सुंदर बासरी आहोत आपण
- वा-यामुळे मनाला बरे वाटते, हा अनुभव दरेकाने घेतलेला असतो. येथे कवीने तीन टप्प्यांवर अनुभूती घेतली आहे. शेराचा प्रवास तीन टप्प्यांवर होतो. वाचकांनाही याच क्रमाने अर्थ उलगडत जाणे, संभवनीय आहे. प्रथम कवीला वारा माणसाप्रमाणे भेटलेला आहे. सर्वसामान्यांना वा-याची जाणीव होते; कवीला तो 'भेटतो' . पुढे, भेटण्यामुळे कवीच्या जाणीवा-नेणिवा जाग्या झाल्या आहेत. अखेरीस, केवळ जाग्या झाल्या नाहीत तर संगीतापर्यंत घेऊन गेल्या. त्याच्या आत्म्याची बासरी वाजू लागली. 'आपण' चा अर्थ प्रथमदर्शनी आत्मा असा दिसतो. वास्तविक, आत्मा देहास चेतना देतो. त्याच्या सूचनेनुसार, देह कार्य करतो. येथे कदाचित् आत्म्याने स्वतःच्या कामातून तात्पुरती सुटी घेऊन स्वतःच संगीतमय कार्य केले आहे. काही जण 'आपण' चा अर्थ
फक्त 'शरीर' किंवा 'शरीर व आत्मा' दोन्ही असाही घेतील. प्रत्येकाच्या अनुभवकक्षा निरनिराळ्या असतात.
रम्य शेर.

कोसळू मातीत अन्‌ मृद्गंध उधळू...
दोन वळवाच्या सरी आहोत आपण
- वळवाच्या अगदी थोड्या सरी जरी पडल्या तरी मातीचा वास घमघमू लागतो. कवी म्हणतो, आपण जरी दोनच वळवाच्या सरी असलो तरीसुध्दा आपण मातीत कोसळू आणि भोवतालावर मृद्गंध उधळू; गंध उधळण्यासाठी भरपूर सरी असण्याची आवश्यकता नाही.
कोसळू म्हणजे केवळ कार्य करू आणि मोकळे होऊ असे नाही तर कोसळून मातीतच मिसळून जाऊ अशी महत्त्वाची छटा या शेराला आहे. चल आता, तू आणि मी, आपण मस्तपैकी हातात हात घेऊन खाली कोसळू आणि गंध उधळू. आपले हेच कार्य आहे, असे दोन वळवाच्या सरी एकमेकांना म्हणत आहेत असेही मनोचित्र उभे राहते. नाहीतरी, खाली कोसळण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. पर्याय नाहीच तर जोरात कोसळून गंधाची उधळण का करू नये, अशीही एक छटा आहे. मुग्ध तारूण्यात पदार्पण केलेल्या, जीवनाच्या दुःखांचा स्पर्श न झालेल्या दोन मैत्रिणी एकमेकींशी बोलत आहेत, असेही चित्र उभे राहते. जिद्द, दुर्दम्य आशावाद, समर्पण या तीनही गुणांचे एक सुंदर संमेलन या शेरात भरलेले आहे.
ज्योत छोटीशी जरी...या शेराशी हा शेर नाते सांगतो.

केवढे हे रंग उठले या मनावर
कोणत्या ठसलो उरी आहोत आपण ?
- काहीतरी ऐकल्यावर, पाहिल्यावर, वाचल्यावर किंवा कोणाशी तरी
बोलल्यावर मनावर परिणाम होतो. कवीच्या मनावर रंग तयार होतात. काव्यमय भाषेत रंग 'उठतात'. येथे कोणाशी संवाद झालेला आहे किंवा कशाचा
अनुभव घेतला आहे, हे संदिग्ध आहे. काहीतरी नक्कीच घडेलेले आहे आणि समोरच्या उरात आपण ठसलेलो आहोत. त्यातून त्या व्यक्तीच्या मनावर काही परिणाम झाला की नाही, हे गुलदस्त्यात आहे. ते ज्ञात करून घेण्याची तशी आवश्यकताही नाही पण एवढे नक्की की, त्या व्यक्तीमुळे आपल्या मनावर काही रंग उठलेले आहेत. ही व्यक्ती कोण, हे कसले रंग आहेत, आत्ताच रंग उठण्याची गरज होती का,असे विचार करायला लावणारे प्रश्न कविमनात उभे राहिलेले आहेत.
ऊर आणि मन हे लाक्षणिक अर्थाने जवळजवळ जाणारे शब्द योजले गेल्यामुळे एक गंमत तयार झाली आहे. गंमतीदार तितकाच गूढ शेर.

आपल्या खांद्यावरी हे आपले शव
आपले खांदेकरी आहोत आपण
- आपल्या मृत्यूनंतर आपल्याला स्मशानापर्यंत न्यायला कोणीही येणार नाही. तोंडावर गोड बोलणारे हे जग मृत्यूनंतर साधे समाचारालाही येत नाही. जग अतिशय निष्ठूर आहे. हा आतापर्यंत अगणित वेळा कवितेत येऊन गेलेला विचार आहे. स्वतःचे शव स्वतःच्या खांद्यावर न्यावे लागणे, या विचाराची नियमित कविताअभ्यासकांना सवय आहे. दुसरा अर्थ असा होऊ शकतो की, मरणाची वाट पाहायची गरज नाही. हयात असतानाही आपल्याला स्वतःला स्वतःच वाहून न्यावे लागते. मदतीला दुसरे कोणीही येणार नाही, येत नाही. त्या अर्थाने हयातभर आपले अस्तित्व एखाद्या शवासमानच असते.पारंपरिक विचार असलेला शेर.
म.भा.चव्हाणांचा एक शेर उध्दृत करतो -
नाईलाजाने स्वतःला शेवटी खांदा दिला मी
जे जमा झाले घरी ते भाषणे ठोकून गेले

ही हवा येते कुठे अपुल्या हवेला ?
फूल फुललेले जरी आहोत आपण
हा शेर मला नीटसा कळलेला नाही.

रक्त-मांसाची कुठे जाणीव होते ?
रक्त-मांसाचे जरी आहोत आपण
- आपण सगळे रक्त मांसाचे बनलेलो आहोत, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. तरीसुध्दा, जीवन जगताना आपल्या मनात रक्त व मांस सोडून बाकीचे विचार असतात. ज्यामुळे आपली घडण झालेली आहे त्याचा पूर्ण विसर माणसाला पडलेला असतो आणि दुस-याच गोष्टींबद्दल त्याचे व्यवहार सुरु असतात,ही एक वस्तुस्थिती आहे. हा शेर संस्कृतीसंदर्भात घेता येईल. आपण आपले भोवताल, कुटुंब आणि पर्यायाने संस्कृती यांच्यामुळे घडलेलो, बनलेलो असतो. त्यांच्याच खांद्यावर आपण उभे असतो पण प्रत्यक्ष जीवनात त्यांचा अंमळ विसरच पडलेला असतो. विसर पडला तरी शेवटी जगायला त्याच गोष्टींची गरज लागते, हे हा शेर हळूच ध्वनित करतो.
वैज्ञानिक सत्य आणि कविता यांची उल्लेखनीय सांगड घातली गेलेली आहे.

क्षुद्र इतके भासते का विश्व सारे ?
कोणत्या टप्प्यावरी आहोत आपण ?
- हा शेर दोन पातळ्यांवर अभ्यासता येईल. वास्तव आणि आध्यात्मिकता.
वास्तवात एखादी अशी कल्पना केली जाऊ शकते की, एखाद्या उंच टेकडीवर
आपण उभे आहोत आणि खालचे गाव फार लहान दिसत आहे. या पातळीवर
हा चित्रशेर आहे. आध्यात्मिकतेच्या दुस-या पातळीवर कैफ दृष्टीस पडतो. माणसांना कधी कधी इतका गर्व होतो की, त्यांना हे विश्व क्षुद्र भासते. आपण कैफात इतके मदमस्त झालेलो आहोत की अफाट विश्व क्षुद्र वाटावे. हा खरोखरीच एखादा टप्पा आहे की, कैफाने घातलेली भूल आहे, असा छुपा सवाल या शेरात आहे. हा टप्पा नसून निव्वळ फसवणूक आहे.
उत्तम शेर.

आपल्या डोळ्यांस मानू चंद्रभागा
दु:ख वारी, पंढरी आहोत आपण
- ज्याप्रमाणे पंढरीची वारी दरसाल नियमित येते, त्याप्रमाणे माणसाला
दुःखही या ना त्या कारणावरून नियमितपणे होते. दुःखाच्या रुपातील वारी माणूसरुपी पंढरीला भेट देतेच देते. बरं, नुसतीच भेट देत नाही तर सोबतीला आसवांची चंद्रभागा नदी आहेच. नदीशिवाय वारीची परिपूर्ती होत नाही. वेदना कोरड्या नसतात. आसवांच्या पाण्याने भरलेल्या नदीने त्यांना भावनात्मक ओल दिलेली असते. येथे पंढरीला पोचलेले, थकलेले, शुष्क झालेले वारकरी चंद्रभागेत न्हातात, हा सामाजिक संदर्भ लक्षात घेण्यासारखा आहे.
कवीने उच्च आध्यात्मिक विचार मांडलेला आहे.

'आपण' ही रदीफ दुहेरी आहे. ती वापरून कवी स्वतःला काही प्रश्न विचारत आहे आणि पटावर फासा टाकावा तसे वाचकांच्या, पर्यायाने समाजाच्या दिशेने सवाल टाकत आहे. या गझलेतील प्रत्येक शेर अर्थाच्या अनेक शक्यता दाखवणारा आहे. लहान वृत्तातील पण अर्थाचे जबरदस्त अवकाश तयार करणारी ही एक कसदार गझल आहे.

प्रतिसाद

Chann .

उत्तम रसग्रहण, आवडले.

"लहान वृत्तातील पण अर्थाचे जबरदस्त अवकाश तयार करणारी ही एक कसदार गझल आहे."

सहमत.