कशाचा शोध काही घेत नसतो

कशाचा शोध काही घेत नसतो
दिवसभर काय तो नक्की गुगलतो

फिरावा एक झाडोझाड पक्षी
तसा तो क्लिकत पानोपान फिरतो

करावे काय नाही सुचत बहुधा
उगा टचस्क्रीनवर बोटे फिरवतो

पुढे नावात केवळ नाव उरते
कधी तो परवलीचा शब्द असतो

जणू टिचकीत आहे विश्व अवघे
स्वतःला काय तो आहे समजतो

गझल: 

प्रतिसाद

फिरावा एक झाडोझाड पक्षी

गझल आवडली. आधी वाचताना वाटले की गुगलतो, क्लिकत हे शब्द तुम्ही वापरावेत हे आपल्याला आवडलेले नाही आहे. पण पुन्हा विचार केल्यावर मनात आले की अक्षरशः प्रत्येकाचे हेच चाललेले असते दिवसभर! ते गझलेत आले, भाषेचा तो बाजही गझलेत आला तर भलेच होईल. आणि तसेही ते शब्दही आता नित्य वापराचे झाले आहेत.

करावे काय नाही सुचत बहुधा
उगा टचस्क्रीनवर बोटे फिरवतो

पुढे नावात केवळ नाव उरते
कधी जो परवलीचा शब्द असतो

फिरावा एक झाडोझाड पक्षी
तसा तो क्लिकत पानोपान फिरतो

जणू टिचकीत आहे विश्व अवघे
स्वतःला काय तो नक्की समजतो

माझा आधीचा प्रतिसाद हवा तसा उमटला का नाही माहीत नाही.

फिरावा एक झाडोझाड पक्षी ही ओळ अतिशय उत्तम वाटली. अनाथ भिकार्‍याचा मुलगा दारोदार फिरावा तसा फील आला. तसेच पानोपान हा शब्द वाचूनही झाले.

टचस्क्रीन आणि परवलीचा शब्द हे शेर वाचून 'फसवे बिझी दाखवण्यातील' रिक्तपणाची जाणीव बोचली मनाला!

फिरावा एक झाडोझाड पक्षी आणि जणू टिचकीत आहे विश्व अवघे हे शेर अप्रतिम वाटले.

धन्यवाद!

पुढे नावात केवळ नाव उरते
कधी जो परवलीचा शब्द असतो

Aatishay Awadala

भूषण,

पुढे नावात केवळ नाव उरते
कधी जो परवलीचा शब्द असतो
लोक 'परवलीचा शब्द' म्हणून आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव घेतात. नंतर ती व्यक्ती आवडेनाशी होते किंवा तिला विसरूनही जातात. त्यावरून हा शेर सुचला. अर्थात, इतर कंगोरे, छटा आहेच शेरात. म्हटले तर एखाद्याचे नाममाहात्म्य संपल्यानंतरची ही अवस्था. किंवा म्हटले तर काळाचा महिमा.

आधी वाचताना वाटले की गुगलतो, क्लिकत हे शब्द तुम्ही वापरावेत हे आपल्याला आवडलेले नाही आहे. َ>> म्हणूनच वापरले आहेत, असे समजा :) गमतीचा भाग सोडा; पण त्या शब्दांना पर्यायही नव्हते चांगलेसे.

गझल आवडली :

पुढे नावात केवळ नाव उरते
कधी जो परवलीचा शब्द असतो

नातेसंबंधात होत जाणारा बदल छान टिपला आहे..

इंग्रजीत i googled it असा प्रयोग आजकाल सर्रास केला जातो..गुगलणे हे क्रियापद जालावर काही शोधण्याची कृती चांगल्याप्रकारे वर्णन करते..या नवीन क्रियापदाचे स्वागत :)

परवलीचा शब्द ........ फारच सुरेख शेर आहे

शेवटचाही मस्त, गझल छान झाली आहे

संपूर्ण गझल आवडली

फारच सुरेख...!

सुंदर शेवटचा शेर चपखल लिहिला आवडली

परवलीचा शब्द हा शेर सर्वांत जास्त आवडला सर

धन्यवाद :)

परवलीचा शब्द .....aah ! kya baat !!

sher tar afalatunach kelela vishleshanahi awadala.

gazal awadali, jawalachi watali.

Dhanywad !

ही गझल खरे तर जरासा विरंगुळा म्हणूनच सुचली होती. टाकायची की नाही, टाकायची की नाही ह्या विचारात होतो. म्हटले टाकून बघू. बघूया काय प्रतिक्रिया येतात. क्लिकणे, गुगलणे ही क्रियापदे मराठी आंतरजालीय समुदायात अनेक वर्षांपासून वापरात आहेत.

चित्तरंजन,
तुमची गझल मी रीडली आणि लाईकलीसुद्धा.
फक्त ईंग्लिश वर्डांना मराठी गझलेत युझू नये असे थोडे थिंकल्यावर वाटले.

जणू टिचकीत आहे विश्व अवघे
हे मात्र पटले. म्हणजे, हेच पटले......

तुमची गझल मी रीडली आणि लाईकलीसुद्धा. फक्त ईंग्लिश वर्डांना मराठी गझलेत युझू नये असे थोडे थिंकल्यावर वाटले. َ>> तुम्ही एव्हढा गंभीर प्रतिसाद दिल्यावर आता मलाही ह्या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करायला हवा.

पुढे नावात केवळ नाव उरते
कधी तो परवलीचा शब्द असतो

वा व्वा !
गझल आवडली .

नवीन क्रियापदाचे स्वागत

हा हा ….
चित्तरंजन,
>>>>तुम्ही एव्हढा गंभीर प्रतिसाद दिल्यावर आता मलाही ह्या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करायला हवा. तुम्ही प्रतिसादात दोन वेळा "गंभीर" असे लिहिल्याने वाचताना मजा आली. असो.

मला वाटते कि तुम्ही अशा काही प्रयोगात्मक गझलांसाठीही एखादा धागा वेगळा सुरू करावा. कारण, हल्ली या मिंग्लिश भाषेचे पेवच आले आहे. असा धागा सुरू झाल्यास मलाही गंमत म्हणून एखादेवेळी असे काहीतरी लिहिता येइल. तसेच गझलेच्या मुल तंत्राला धक्का लागणार नाही... आणि . . . . मराठीत नसलेल्या या नवीन क्रियापदांचे औपचारिकपणे स्वागतही करावे लागणार नाही कुणाला.
फार स्पष्टपणे लिहिल्याबद्दल क्षमस्व.
मात्र, कविवर्य सुरेश भटांनी मोठ्या हिमतीने साकारू पाहिलेली गझल ही गझलच रहावी, त्याचा खेळ होऊ नये एवढीच इच्छा. धन्यवाद आणि पुन्हा एकदा क्षमस्व.

आजकालच्या लोकांनी बर्‍याच अंशी (निदान जालीय) भाषेत स्वीकारलेली क्रियापदे गझलेत वापरणे हा स्पष्टपणे एक प्रयोगच ठरतो. तसेही चित्तरंजन ह्यांच्या इतर सर्व गझला सर्वज्ञात आहेत व ते असे एखाद्या गझलेत करत असतील तर त्याच्याकडे निव्वळ प्रयोगशीलता म्हणून किंवा आगामी काळात होऊ घातलेल्या गझलांचे मूळ म्हणून पाहणे शक्य आहे.

मात्र (हे ह्या गझलेखाली लिहिण्याबद्दल क्षमस्व), अजय जोशींचा हा प्रतिसाद त्या दुसर्‍या गझलेला (जिच्यात चेहरा व अंगण ह्या शब्दांंमध्ये सूट घेतली आहे) अधिक चपखल रीतीने लागू पडतो असे मला वाटते.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!