आकडेवारी

पाल्हाळ तू लावू नको, दे आकडेवारी मला
जाणीव होते नेमकी संख्येतुनी सारी मला

जेरीस आलो केवढा पुरवून सारे हट्ट मी
केलेस या प्रेमामधे तू कर्जबाजारी मला

झाले तुलाही परवडेनासे भेटणे बागेमधे
दिसते महागाईच माझ्याही घरीदारी मला

काही नको तू ऐकवू डोक्यास देते ताप जे
- ऐकव गड्या कविता जरा हृदयात शिरणारी मला

आता नफ्यावाचून या दिसतेच डोळ्यांना कुठे !
गल्ल्यावरी बसलो तुझ्या, केलेस व्यापारी मला

फिरवाफिरव करतोस तू एकाच शब्दाची कशी ?
क्या बात है ! दोस्ता, तुझी रुचली अदाकारी मला

रस्त्यातला प्रत्येकजण आपापली साखर जपे
मुंग्यांप्रमाणे वाटते ही रोज रहदारी मला

गझल: 

प्रतिसाद

क्या बात है ! दोस्ता, तुझी रुचली अदाकारी मला
चांगली झाली आहे गझल.
झाले तुलाही परवडेनासे भेटणे बागेमधे
ही ओळ वाचताना अडखळतो आहे.

रस्त्यातला प्रत्येकजण आपापली साखर जपे
मुंग्यांप्रमाणे वाटते ही रोज रहदारी मला - vvaa

धन्यवाद.
चित्त, तो शेर काढून टाकावा असे वाटत आहे किंवा पुनर्लेखन करावे लागेल.

परवडेनासे मध्ये गडबड आहेच.
मात्र गझल सुरेखच, शेवटचा शेर फारच सुंदर

क्या बात है!! शेवटचा शेर सहज सुंदर.