किनारा गाठण्यासाठी

कसाही का..! दिला होता सहारा वाहण्यासाठी
प्रवाहाला कसे सोडू किनारा गाठण्यासाठी?

अता पाऊस हक्काचा कुठेही पाडता येतो
अता लांडोरही मागे पिसारा नाचण्यासाठी

मला झाले कळेनासे तुझे संदेश डोळ्यांचे
इशारा देत जा सोपा, 'इशारा' वाटण्यासाठी

जुना वाडा बिर्‍हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी

पुन्हा जातो जगामध्ये उभारी घेत आशेची
पुन्हा येतोच मी येथे ढिगारा टाकण्यासाठी

कधी विश्वास माझा वाटला नाही नशीबाला
हजारो यत्न केले मी 'बिचारा' भासण्यासाठी

तुला बोलावले नाही मनाला हासण्यासाठी
तुला बोलावले होते पसारा लावण्यासाठी

दिला आहे मनाने वेग स्वप्नांना प्रकाशाचा
जरी काळाकडे आहे खटारा हाकण्यासाठी

पुन्हा येणे, पुन्हा जाणे, कुणाची कैद आहे ही?
कुणाला अर्ज धाडावा पहारा काढण्यासाठी?

अशा मुर्दाड लोकांच्या मनी रोमांच आणावा
मरावे 'बेफिकिर'ने मग शहारा आणण्यासाठी

-सविनय
'बेफिकीर'!

गझल: 

प्रतिसाद

पुन्हा जातो जगामध्ये उभारी घेत आशेची
पुन्हा येतोच मी येथे ढिगारा टाकण्यासाठी

छान छान.
दोन-दोन कवाफी असणे हे नाविन्य आहे.
'इशारा' हा शेरही आवडला.

"कुणाच्या धीट शापाने जिवाला पालवी आली,
कुणाची कौतुके होती- धुमारा छाटण्यासाठी...."

ज्ञानेश,

आभार!

कुठल्याही कवितेची ओळ उच्चारताना जितके जास्तीतजास्त उच्चार साधर्म्य असलेले असतील तितके गुणगुणायला बरे वाटते. ( ही सदर गझल 'गुणगुणायला' वगैरे 'बरी' आहे असा दावा नाही.)

-सविनय
'बेफिकीर'!

काय चाललंय काय!
रोज एकाहून एक सुंदर रचना!

जुना वाडा बिर्‍हाडांना मिजासी देत कोसळला
फिरे आनंद पुर्वीचा, निवारा मागण्यासाठी

कधी विश्वास माझा वाटला नाही नशीबाला
हजारो यत्न केले मी 'बिचारा' भासण्यासाठी

अशा मुर्दाड लोकांच्या मनी रोमांच आणावा
मरावे 'बेफिकिर'ने मग शहारा आणण्यासाठी

आपली प्रतिभा सध्या ओसंडून वाहत आहे!
पुढील उत्तमोत्तम रचनांसाठी शुभेच्छा!

जबरदस्त रचना.

सुरेख. सुरेल.

सुरेख. ढिगारा आणि पसारा जास्त आवडले

पुन्हा येणे, पुन्हा जाणे, कुणाची कैद आहे ही?
कुणाला अर्ज धाडावा पहारा काढण्यासाठी?

विशेष आवडला.

क्या बात है बेफिकीर.. नेहमी प्रमाणे उत्कृष्ठ! मजा आली.

फारच छान!!!!
मी काही भावना गझलेच्या स्वरुपात लिहिन्याचा प्रयत्न करत असतो पन शब्द मान्दनि जमत नाही..
काही सुचवु शकाल?
sorry but I'm new here and not comfortable with the marathi writing like this, so neglect the grammer mistakes earlier...
I wanted to ask that whenever I am relating a situation and want to write a ghazal, it is hard for me to
get hold of various words, their meanings and the style that has to be followed for a ghazal..
Can you guide me??

अता पाऊस हक्काचा कुठेही पाडता येतो
अता लांडोरही मागे पिसारा नाचण्यासाठी
...
gretaly written.....Awesome....!!

अता पाऊस हक्काचा कुठेही पाडता येतो
अता लांडोरही मागे पिसारा नाचण्यासाठी
......
Awesomely written....simply great....!!