कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

'शहाणा होउनी मरशील ही संभावना आहे'
कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

तुझ्याशी त्याच निष्ठेने पती वागायचा नाही
तुझे आजन्म पातिव्रत्य ही वारांगना आहे

पुरे आयुष्य काढावे तरी माहीत नाही की
जगाशी सामना नाही स्वतःशी सामना आहे

तुलाही शेवटी तिरक्या कटाक्षांची सवय जडली
मला वाटायचे माझीच सारी वल्गना आहे

इथे मी बोलण्याआधीच अग्नीही दिला त्यांनी
मला न्या रे स्माशानातून थोडी चेतना आहे

मुळी बोलू नये काही तुझ्याशी रोज बोलावे
अशीही कामना आहे तशीही कामना आहे

'सुधारावे अता आपण' अशी नक्कीच आहे पण
'पुढे केव्हातरी पाहू' अशी ती योजना आहे

बघा माझ्याकडे आता, अता माझे खरे नाही
अता माझ्या विचारांना निराळी चालना आहे

कधी नुसते कुशीमध्येच डोळा लागता कळते
खरे ते प्रेम आहे नाव ज्याचे वासना आहे

तशी सांगायला नाहीत दु:खे आज काहीही
तरी ऐकायला नाहीस तू ही वेदना आहे

कुणाच्या दर्शनासाठी कधी रांगेत नसतो मी
मला अस्तित्व आहे हीच माझी प्रार्थना आहे

जशी या जीवनाशी होत हस्तांदोलने माझी
तुलाही ताठ मानेनेच मृत्यो वंदना आहे

तसा मी एरवी सामान्य लोकांसारखा असतो
तरीही 'बेफिकिर' होतो जिथे संवेदना आहे

गझल: 

प्रतिसाद

जशी या जीवनाशी होत हस्तांदोलने माझी
तुलाही ताठ मानेनेच मृत्यो वंदना आहे.. ............. चांगला!

तशी सांगायला नाहीत दु:खे आज काहीही
तरी ऐकायला नाहीस तू ही वेदना आहे............मस्त!!

तसा मी एरवी सामान्य लोकांसारखा असतो
तरीही 'बेफिकिर' होतो जिथे संवेदना आहे........सुरेख!!!

'सुधारावे अता आपण' अशी नक्कीच आहे पण
'पुढे केव्हातरी पाहू' अशी ती योजना आहे.......बरा!!!

बाकी माझ्या आवाक्या बाहेर!!

सामना, चेतना, कामना, चालना, वंदना

आवडलेत.

ब-याच दिवसांनी प्रतिसाद देतोय..

एखादी सामान्य गझल आणि चांगली गझल यात मला जाणवणारा फरक म्हणजे
सामान्य गझलेत नुसतेच शब्द एकपुढे एक जोडून गम्मत आणण्याचा प्रयत्न केलेला असतो
उलट चांगल्या गझलेतील शेरांमधे एक तत्त्वज्ञान सांगितले असते....

उदाहरणार्थ, या गझलेत पहिले पाचही शेर हे उत्स्फूर्त आणि फिलॉसॉफिकल झालेत
पुढील दोन-तीन शेरात थोडीशी कृत्रिमता जाणवतेय...

एकन्दरित गझल आवडली, चांगली झालीये!

तशी सांगायला नाहीत दु:खे आज काहीही
तरी ऐकायला नाहीस तू ही वेदना आहे

गझल आवडली...

तुझे आजन्म पातिव्रत्य ही वारांगना आहे

फार आवडली ही ओळ.

तशी सांगायला नाहीत दु:खे आज काहीही
तरी ऐकायला नाहीस तू ही वेदना आहे

सुरेख.
गझल आवडली.

गझल चांगली आहे. वारांगना, वेदना आणि अस्तित्व विशेष.

'सुधारावे अता आपण' अशी नक्कीच आहे पण
'पुढे केव्हातरी पाहू' अशी ती योजना आहे

क्या बात है!

बेफिकीर.. गझल फार छान जमली आहे.. शुभेच्छा.