मंतरलेल्या सायंकाळी

मंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..
अंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..

सांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...
दूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..

रोज पहाटे झेलत असते, कोसळणार्‍या दवबिंदूंना...
..आज कळेना स्पर्शानेही, का थरकापे कर काहीसा...!

ही गगनाची तेजसमाया...वा क्षितिजाचा सोनकिनारा...
...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा..

केवळ काही जलधारांनी शीतल भासे तपती काया
सावरलेले मन काहीसे...ओसरलेला ज्वर काहीसा...

- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

सांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...
दूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..
सुंदर...!

सुंदर गझल. सगळेच शेर आवडले.

मंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..
अंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..
वाव्वा, फारच आवडला.

फ़िराक़ गोरखपुरी ह्यांच्या
शाम भी है धुआँ धुआँ, हुस्न हुस्न भी है उदास उदास
दिल को कई कहानियाँ यादसी आके रह गयी
ह्या शेराची, त्या मूडची प्रकर्षाने आठवण झली.

दूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा.. वा!

की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा.. वा मस्तच

केवळ काही जलधारांनी शीतल भासे तपती काया
सावरलेले मन काहीसे...ओसरलेला ज्वर काहीसा... सुंदर
बोरकर+ बालकवी+ग्रेस्..असा काहीसा परिणाम साधला आहे(काहीसे जड होते अंतर ...कातर होतो स्वर काहीसा.. असे केल्यास?)

-मानस६

मंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..
अंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..

सांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...
दूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..

ही गगनाची तेजसमाया...वा क्षितिजाचा सोनकिनारा...
...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा..

मतला आणि हे दोन शेर विशेष आवडले...अजून येऊ द्या...!

ही गगनाची तेजसमाया...वा क्षितिजाचा सोनकिनारा...
...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा..

सुंदर गझल. गितच वाटले आधि. तपती चाल्ते का हो? तप्त हवे नं?

हो! 'तपती' चालते. 'तपणे' या क्रियापदाचे ते विशेषण / नाम म्हणून चालते. नव्हे, बरोबरही आहे.प्रतिक्रियेबद्दल हार्दिक धन्यवाद.
संतोष

डॉक्टरसाहेब,
एकदम सुरेख गझल..सगळेच शेर आवडले..आजून येऊद्या..

आमचा दुसरा एक प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार.

जी.ए. कुलकर्णी यांच्या वातावरण निर्मितीची आठवण -
विशेषतः -
अंधाराचा अंथरलेला थर  ही उपमा
तेजसमाया, सोनकिनारा  हे शब्द - यांमुळे.

पहिल्या दोन शेरांनी खरोखरच मंत्रमुग्ध झालो.
अभिनंदन.

फारच सुंदर निसर्ग-भाव गझल! स्वर, थर आणि ज्वर हे शेर विशेष आवडले...

   गझल छानच. वर काही प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे जीएच आठवतात आणि गीत असल्यासारखीही वाटते.