साचला अंधार आहे...

साचला अंधार आहे युगभराचा
अन दिवा हातामधे काही पळाचा

कोण राबुन जात असते रोज येथे
दव म्हणू की घाम असतो हा कुणाचा

मी कधीचा नांगरुन बसलो स्वताला
पण अजुन पत्ताच नाही पावसाचा

मीच माझ्या जीवनी कुंद्याप्रमाणे
मीच दुश्मन जाहलो माझ्या पिकाचा

जीवनाचा मी तुझ्या आनंद आहे
तू कधी आनंद हो माझ्या क्षणाचा

मिसळुनी घेतो मला मातीमध्ये मी
मग पिकाला वास येतो चंदनाचा

फोडतो मी पाठ माझी आसुडाने
मीच आहे बैल माझ्या नांगराचा

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

मतला मस्त आहे....
इतर शेरांमधून ''शेतकर्‍याच्या '' यातनांचा मूड तयार होतो.
''कुंद्या'' चा अर्थ मला कळाला नाही.....

चांगली गझल...

दुसरा शेर आवडला.
छान.

कुंदा म्हणजे पिकातले तन

धन्यवाद वैभवराव....

मिसळुनी घेतो मला मातीमध्ये मी
मग पिकाला वास येतो चंदनाचा

वा!

वा! दादा, क्या बात है|