'' प्रश्न''

'' प्रश्न''

का नको त्याला मला मोठे म्हणावे लागले?
फ़ासुनी शेंदूर दगडाला पुजावे लागले

त्यागण्याला राजवैभव सिद्ध व्हावे लागले,
का असे त्या गौतमाला बुद्ध व्हावे लागले?

तो जरी नव्हताच दोषी कोणत्या खटल्यातला,
हाय ! येसूला क्रुसावरतीच जावे लागले

लीन होती खास मीरा कृष्ण भक्तीतच सदा
का तिला कडवे विषाचे घॊट प्यावे लागले?

जो न होता शिष्य त्यांचा,द्रोणही नव्हते गुरु
अंगठ्याला एकलव्या,का मुकावे लागले?

हा मला ही प्रश्न आता भेडसावू लागतो
का तुकोबालाच वैकुंठास जावे लागले?

आज ते ’आंबेडकर’ म्हणती जरी मानव खरा
काल त्याला चंदनासम का झिजावे लागले?

बाब इतुकी आजही ’कैलास’का सलते मनी?
त्यागण्या हिंसा तुला हिंसक बनावे लागले.

डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

एकलव्य,आंबेडकर आणि मक्ता मस्त आवडलेत.

प्रत्येक शेरात एकच गोष्ट आहे असे वाटते. ती वेगवेगळ्या प्रसंगातून सांगितली आहे. मात्र, केवळ ऐतिहासिक उल्लेखांमुळे ताकद थोडी कमी झाली आहे असे वाटते.

धन्यवाद गंगाधरजी,
धन्यवाद अजयजी,
ही गझल पूर्ण झाल्यावर माझ्या डोळ्यासमोर.. इलाहीजींची ''चुकले का हो?'' ही गझल आली.... सगळ्या शेरांत जवळ जवळ आशय तोच आहे...असो...

बाकी आपण म्हणाल्या प्रमाणे ऐतिहासिक संदर्भांमुळे ताकद थोडी कमी झालीय हे एकदम मान्य..... गझलेशी शायरास स्वःतास रिलेट करता आले नाही तर गझल पडते.. तसे काहिसे झाले आहे.....
प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.

कैलास,
मी ऐतिहासिक म्हटलेले नाही. मी "केवळ ऐतिहासिक" असे म्हटले आहे. कारण, नावांचा असलेला उल्लेख प्रतिकात्मक नसून ऐतिहासिक असल्यासारखा भासतो आहे.
मतला आणि मक्ता वेगळे आहेत. त्यातला मतला चांगला आहे.
धन्यवाद.

मनाच्या गाभा-यात घुमणारी गझल.

प्रश्न हा आहे की भुतकाळ कधीच अदृश्य होत नाही का?
मानगुट माझीच तो सोडायचा विचारही करत नाही का?