जाळीत फक्त जगणे

फसव्या अशा जगाशी जमले कसे मनाचे
खोटेपणात मन ही रमले कसे मनाचे

शोधात भाकरीच्या पोटात आग फिरते
पाउल चालणारे दमले कसे मनाचे

लावुन हे मुखवटे जो तो उगाच हसतो
हास्यात दुःख सारे नमले कसे मनाचे

संग्राम भोवताली चालेच सावल्यांचा
ओठात स्तब्ध झाले हमले कसे मनाचे

झंकारती कशाने तारा जुनाट झाल्या
स्पर्शात नाद सारे घुमले कसे मनाचे

मरणात पुस्तकाच्या पाने विदीर्ण झाली
जाळीत फक्त जगणे शमले कसे मनाचे

अवधूत

गझल: 

प्रतिसाद

गझलेत बर्‍याच नवीन गोष्टी आहेत.....
काही ठिकाणी कृत्रिमता जाणवली...

शेवटचा शेर खूप आवडला..... फक्त त्यातही जाळीत ऐवजी ''जाळून'' असावे असे वाटले...

चांगली गझल.

डॉ . कैलास

मरणात पुस्तकाच्या पाने विदीर्ण झाली
जाळीत फक्त जगणे शमले कसे मनाचे

व्वा व्वा...अगदी दाद देण्याजोगा शेर.गझल ठीक.

पाचव्या शेरातील 'घुमले' अलामत चुकते आहे ते पहावे.

चांगली रचना!
लावुन हे मुखवटे जो तो उगाच हसतो
हास्यात दुःख सारे नमले कसे मनाचे

येथे नमले ऐवजी रमले अधिक समर्पक वाटेल!

शुभेच्छा!
---------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

कैलासजी, नचिकेतजि , निलेशजी प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सूचनांचा जरूर विचार करेन. थोडसं खुलासा "जाळीत" विषयी असं की पिंपळ पानाची झालेली जाळी या अनुषंगाने तो शब्द वापरला आहे. निलेशजी एक विनंती अशी की अलामत च्या संदर्भात थोडासा खुलासा आपण केलात तर खूप बरं होईल.
धन्यवाद
अवधूत

धन्यवाद, आपल्या सुचना खुप योग्य आहेत.
अवधुत