धीट माझी प्रीत होती




धीट माझी प्रीत होती


गीत माझे गात होती
चांदणे शिंपीत होती

तो खरा नव्हता लळा, ती
वागण्याची रीत होती


सोंग होते सोहळ्याचे
माणसे चिंतेत होती


पाहुनी ना पाहिले मज!
(कोणत्या धुंदीत होती? )

दोष नाही पुरुरव्याचा
अप्सरा शापीत होती


शर्थ केली वादळाने
धीट माझी प्रीत होती

- सोनाली जोशी




गझल: 

प्रतिसाद

तो खरा नव्हता लळा, ती
वागण्याची रीत होती

सोंग होते सोहळ्याचे
माणसे चिंतेत होती
वा वा. हे दोन शेर विशेष. एकूण गझल आवडली.दोष नाही पुरुरव्याचा
अप्सरा शापीत होतीयात सरळ 'उर्वशी' हा शब्द न वापरण्याचे काही खास कारण? छंदातही बसतो तो.



"या जगात ऐकू आली डबक्यांची गाज कुणाला?
हो 'मिलिंद' सागर तेव्हा कवनांना कंठ फुटावा"

मिलिंद, ह्या गझलेतील हा शेर बराच आधी पूर्ण केला होता. त्यावेळी पुरुरवा आणि उर्वशी हीच गोष्ट आठवत होती. पण उर्वशी पेक्षा दुसरी असेल आणि स्मरणशक्तिने दगा दिला तर सोय म्हणून अप्सरा:) 
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
 

गझल आवडली. विशेषतः वरचे दोन शेर.

तो खरा नव्हता लळा, ती
वागण्याची रीत होती
वा!

यादगार यांच्याशी सहमत. गझल छान!
असे काहीसे करून बघा-
गात जेव्हा गीत होती
चांदणे शिंपीत होती

सोंग होते सोहळ्याचे
माणसे चिंतीत होती
(एवढी सूट घ्या. किंवा दुसरे काहीतरी)

तंत्रशुद्ध असायला पहिजे गझल.
आता काफिये आणि रदिफ बघा:
गात होती         ????
पीत होती
रीत होती
तेत होती         ?????
दीत होती
पीत होती
प्रीत होती

.....प्रसन्न


थोडे बदल करून काफियात घेतलेली सूट टाळता येइल, सर्व सुचवण्या पटल्या.
आभार.

पाहुनी ना पाहिले मज!
(कोणत्या धुंदीत होती? )
आवडले.


तो खरा नव्हता लळा, ती
वागण्याची रीत होती
शर्थ केली वादळाने
धीट माझी प्रीत होती
दोन्ही शेर फारच छान ...!
.....................................................
१) मतल्यात य़मकाची गडबड का झाली (केलीस)...?
२) तिसर्‍या शेरातही  (सोंग होते....) अशीच  गडबड...!
....अशा गडबडी शक्यतो टाळतच जाव्यात...सरावासाठी सुरुवातीला छोटी-छोटी  वृत्ते योग्यच...पण त्यातच जर अशी 'गडबड' झाली  (केली) तर अशा 'गडबडी'चाच पुढे 'सराव' होण्याची शक्यता असते....! म्हणून सुरुवातीलाच सावध असावे...
३) शेरात मोघमपणा, संदिग्धता असू नये....शक्यतो हे टाळावे.
उदाहरणार्थ :
गीत माझे गात होती
चांदणे शिंपीत होती
- गीत माझे गात होती.....कोण ? तर ती...! हे तर्काने जाणता येते...पण मोघमपणा टाळल्यास ऒळ अधिक गोटीबंद व्हायला मदत होते...
हाही शेर पाहा -
पाहुनी ना पाहिले मज!
(कोणत्या धुंदीत होती? )
कुणी पाहिले नाही ?....तर अर्थातच तिने..., हेही येथे तर्काने जाणता येते....पण .....
स्पष्ट लिहिल्याबद्दल तुला राग येणार नाही, असे वाटत असल्यामुळेच तसे लिहिले आहे...
बाकी वरचे दोन शेर (वागण्याची रीत, धीट माझी  प्रीत ) खूप आवडले... पुढच्या गझलेची वाट पाहत आहे.
शुभेच्छा...!
 

पाहुनी ना पाहिले मज!
(कोणत्या धुंदीत होती? )
इथे मला असे सुचवावेसे वाटते:
पाहुनी मज पाहिले ना!
(कोणत्या धुंदीत होती? )
ज्यामुळे `नी ना' चा दोष दूर होईल.

आवडलेले शेर :

तो खरा नव्हता लळा, ती
वागण्याची रीत होती

दोष नाही पुरुरव्याचा
अप्सरा शापीत होती

चित्तरंजन भट यांच्याशी सहमत. गझल छान!
असे काहीसे करून बघा-
गात जेव्हा गीत होती
चांदणे शिंपीत होती

सोनाली,
तो खरा नव्हता लळा, ती
वागण्याची रीत होती

-- हा शेर स्मरणीय!

छोटा बहर व गझल आवडली.
जयन्ता५२