तरी समुद्रा तुझ्या किनारी

लाटांनी येऊन शरण लोटांगण घेणे संपत नाही
तरी समुद्रा तुझ्या किनारी पुर्वीइतके करमत नाही

सोसाट्याचा वारा हिरव्या पानांनाही घेउन जातो
असे वाटल्याने दबलेली नवी पालवी उमलत नाही

चौकामध्ये गाडी पुसुनी टकटक करते पोर भिकारी
खिशातून रुपया काढेतो लाल बावटा राहत नाही

अजून बसते तिथेच अमुच्या लहानपणची भाजीवाली
मुलगा पिऊन मेला, नातू, सून कुणीही फिरकत नाही

वनवेवर एकाच दिशेने जात राहती गाड्या सार्‍या
तरी त्यात आवाज कशाला होतो काही समजत नाही

पावसात छत्री वागवतो, उन्हाळ्यामधे टोपी असते
इतके सांभाळुनही डोके ऐन प्रसंगी चालत नाही

'बेफिकीर' तब्येतीसाठी औषध, पाणी, पैसा आहे
एक वेळ येतेच म्हणे जेव्हा हे काही चालत नाही

गझल: 

प्रतिसाद

नवी पालवी उमलत नाही,

ऐन प्रसंगी चालत नाही

आणि

वनवेवर एकाच दिशेने जात राहती गाड्या सार्‍या
तरी त्यात आवाज कशाला होतो काही समजत नाही

हे शेर जास्त भावले.

विचार देणारी व विचार करायला लावणारी...
अप्रतीम गझल!!!

पावसात छत्री वागवतो, उन्हाळ्यामधे टोपी असते
इतके सांभाळुनही डोके ऐन प्रसंगी चालत नाही

'बेफिकीर' तब्येतीसाठी औषध, पाणी, पैसा आहे
एक वेळ येतेच म्हणे जेव्हा हे काही चालत नाही

व्वा !

गझल एकंदर छान झाली आहे. शेवटचे दोन शेर विशेष.

तरी समुद्रा तुझ्या किनारी पुर्वीइतके करमत नाही
ही ओळ छान.

पावसात छत्री वागवतो, उन्हाळ्यामधे टोपी असते
इतके सांभाळुनही डोके ऐन प्रसंगी चालत नाही

'बेफिकीर' तब्येतीसाठी औषध, पाणी, पैसा आहे
एक वेळ येतेच म्हणे जेव्हा हे काही चालत नाही
वा वा! हे दोन्ही विशेष

सर्वांचे आभार!

मस्त ! आवडली !
वनवेवर....वगैरे इंग्रजी शब्द गझलेत वाचताना मौज येते !

अजून बसते तिथेच अमुच्या लहानपणची भाजीवाली
मुलगा पिऊन मेला, नातू, सून कुणीही फिरकत नाही

टचिंग.
एकंदर गझल माईंड ब्लोईंग.

बेफिकीर,
तुमची अलीकडच्या काळातील मला खूप आवडलेली ही गझल आहे. या गझलेत जेवढा मझा आहे, तितकाच मझा प्रत्येक गझलेत यावा, हा प्रयत्न तुम्ही करा. मतला व नंतरचा शेर पारंपरिक आहे. त्यातल्या कल्पना अनोख्या वाटल्या. त्यानंतरचा प्रत्येक शेर हा आधुनिक व्यवहारी जगाचा आहे. त्यामुळे तो पटतोच.
सध्याच्या जगाचे आपले मार्मिक निरीक्षण आहे. विषण्णता सरळ भाष्य करून आणि विसंगती हलक्याशा विनोदी पध्दतीने आपण मांडलेली आहे. द्विपदी प्रभावी झालेल्या आहेत. अशा पध्दतीचे शेर आपण चांगले लिहिता.
अशी आधुनिकता मला सोनाली जोशी यांच्याही गझलांमध्ये सापडते.
आधुनिक जगाच्या गझलांबाबत तुम्हा दोघांकडे पाहायला हरकत नाही.

गझलांचा वेग कमी केलात तर खूप चांगल्या गझला आपल्याकडून होतील.

भन्नाट बरका

सर्वच शेर छान.

गझलांचा वेग कमी केलात का?
नवी गझल कधी?
प्रतिक्षेत...

छान...

गझल वा वा.........

गझल वा वा वा................

क्या बात है!!! दादच द्यावी लागेल. बाकी काहिच बोलत नाही. अप्रतिम!

मस्त ! आवडली !