निराधार

 

लोकशाही सरकार येथे
अन् सरंजामी फार येथे

प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)

सावरावे कैसे कुणाला?
मागते मी आधार येथे

ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे

लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे 

भेट झाली नाही वसंता   
(होतसे का  झंकार येथे?)

सूर्य गेला अस्तास पण हा
 काजवा का बेजार येथे ?    

-सोनाली जोशी

गझल: 

प्रतिसाद

 वेगळ्या  वृत्तातील छान गझल...
प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)

सावरावे कैसे कुणाला?
मागते मी आधार येथे

ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे

लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे 
हे सर्व शेर सुंदर...!  
शुभेच्छा...!

ही घडी आहे उत्सवाची..
दु:ख आहे गर्भार येथे

टोच्लं मनाला..

वेगळ्या बृत्तातली गझल.
अभिनंदन !
लोपला चंद्र कसा अवेळी?
करुन स्वप्न निराधार येथे 
...आवडला.
- केदार

सारेच शेर चांगले आहेत.
प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)
हा  खासच!

सोनाली,
छोटा बहर मस्त जमलाय!सगळेच शेर चांगले आहेत.
जयन्ता५२

प्राजुशी सहमत आहे मी. गजल आवडलि.

गझल चांगलीच आहे. वृत्त निवडताना काळजी घ्यावी. कुणालाही सहज लयीत म्हणता येईल असे वृत्त असावे.

शिष्टाचार, चंद्र आणि काजवे हे शेर खूप आवडले!
-- पुलस्ति.

लयीबाबत चित्तंशी सहमत आहे. नेहमीचीच रूपके (जसे सूर्य-काजवा) टाळता आल्यास उत्तमच.
सावरावे कैसे कुणाला?
मागते मी आधार येथे
हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

सोनाली,
लोकशाही सरकार येथे
अन् सरंजामी फार येथे

प्रश्न कोठे? उत्तर कशाचे?
(मौन हा शिष्टाचार येथे)
हे शेर आवडले.
काजवे (कृष्णशास्त्र्यांच्या अन्योक्तीप्रमाणे) सूर्य असताना (प्रकाशता येत नाही म्हणून) बेजार असतात. तुमचे काजवे काळाप्रमाणे बदललेले दिसतात!
- कुमार

सर्वांचे आभार.
लयीविषयी खबरदारी घेईन.
चक्रपाणि,
सूर्य आणि काजवे असले तरी कल्पना वेगळी आहे. पण तरी रूपके नवीन असायला हरकत नाही. एवढा शोर्टेज नसावा:)
(ही सही नवीन दिसते, सुवर्णमयी असे टोपणनाव घेण्याआधी मी मनोगतावर पूर्ण नावानिशी आले होते त्याची आठवण झाली. )

चांगली गझल..! पण चित्तरंजन यांनी केलेली सूचना करावी वाटते. रसिक अवघडू नये असे वृत्त असावे. नुसताच लघू-गुरूचा जुळणारा क्रम एवढ्यावे आपले समाधान होते. रसिकाचे होईल असे  नाही. अभिनंदन!!