हेच असावे सत्य...

दि. २३ मे च्या मुशायर्‍यात मी सादर केलेली गझल....

हेच असावे सत्य जे कुणी मानत नाही
[ छोटा-मोठा वाद कधीही संपत नाही ]

खरेच आहे दुनिया असते आपलीच, पण...
कुणीच येथे कुणाचसाठी थांबत नाही

संधीसाठी चेला बनला, पाया पडला
आता तर तो ओळखसुद्धा ठेवत नाही

कुणास मिळतो स्वर्ग, कुणाला दुनिया सारी
कुणाकुणाला प्रेम जरासे लाभत नाही

तुझाच होतो, तुझाच आहे, राहीन तुझा
फक्त, जगाच्या समोर आता म्हणवत नाही

ओळख आहे उगाच नुसती दुनियेभरची
कुणाशीच मी कधीच नाते बांधत नाही

निश्चित मिळते काहीबाही बांधावरती
उगीच कोणी नाव कुणाचे घोकत नाही

गझल: 

प्रतिसाद

मला भावलेला शेर :

ओळख आहे उगाच नुसती दुनियेभरची
कुणाशीच मी कधीच नाते बांधत नाही

शेवटचे तीन्ही शेर उत्तम आहेत.
राम क्रुष्ण हरी!!!

धन्यवाद ह बा.

संधीसाठी चेला बनला, पाया पडला
आता तर तो ओळखसुद्धा ठेवत नाही
वा!
गझल आवडली

धन्यवाद सोनाली.
आणखी एक...
जेथे जातो तिथे ताठ मानेने जातो
मी कुठलाही धागा कंठी माळत नाही