शब्द माझे

शब्द माझे एवढे करतील आता
माझियावाचूनही तरतील आता

आजच्यापुरता पुरेसा ध्वस्त झालो
भावनांचे पूर ओसरतील आता

ऊर बडवू लागले सदरे सुखाचे
वेदना मौनात वावरतील आता

माणसांशी जवळचे नाते निघाले
श्वापदे कोणांस घाबरतील आता?

व्यापले आभाळ आता तारकांनी
झोपड्या दारिद्र्य पांघरतील आता

मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता?

जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता

आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता

गझल: 

प्रतिसाद

मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता?
वाव्वा! क्या बात है. लहजा फारच आवडला.

जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता
मस्त. मस्त गझल.

वैभवा.... शब्द अपुरे प्रतिसाद द्यायला... अप्रतिम !
मतल्यापासून मक्त्यापर्यत अप्रतिम रे !

छानच गझल आहे.
आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता

हा प्रकार छानच आहे. गोष्ट खरीच आहे मित्रा! आपण जिवंतपणाचा आणखी काय पुरावा देणार आपले अश्रू सोडले तर?
सुन्दर गझल आहे!

मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता?
जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता
वा..वा...छान...वैभव...!

ऊर बडवू लागले सदरे सुखाचे
वेदना मौनात वावरतील आता
मस्त आहे...

जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता
आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता
अतिशय सुंदर! गझल आवडली...

भावना, मारण्याआधीच आणि पुरावे - हे शेर खूपच आवडले! सुंदर गझल वैभव.
-- पुलस्ति.

वा वैभव,
शब्द माझे एवढे करतील आता
माझियावाचूनही तरतील आता
हा मतला आणि
ऊर बडवू लागले सदरे सुखाचे
हा मिसरा विशेष आवडले.
मतला वाचून माझी एक गझल आठवली.
'फिरुनी तुझ्या सुरांना फसतील शब्द माझे
स्वरसाज लेवुनी अन् हसतील शब्द माझे
व्यवहार रोज करतो भाषेत मीच परक्या
का सांग या जगावर ठसतील शब्द माझे?'
अर्थात, तुमचे शब्द तरणारे आहेत. वा! वा!
- कुमार

उत्कृष्ठ..! एक एक शेर अप्रतिम..!!

शब्द माझे एवढे करतील आता
माझियावाचूनही तरतील आता ...व्वा!

आजच्यापुरता पुरेसा ध्वस्त झालो
भावनांचे पूर ओसरतील आता ...सुंदर.

ऊर बडवू लागले सदरे सुखाचे
वेदना मौनात वावरतील आता ...व्वा!

माणसांशी जवळचे नाते निघाले
श्वापदे कोणांस घाबरतील आता? ...खल्लासच!

व्यापले आभाळ आता तारकांनी
झोपड्या दारिद्र्य पांघरतील आता ...खरेच.

मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता? ...लगे रहो

जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता ...असेच घडते.
माझा एक शेर होता...
मी रक्त ओकले मनोरंजनासाठी...
पण तहान त्यांची तरी भागली नाही

आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता ...हेही खरे

झकास गझल..!

शब्द माझे एवढे करतील आता
माझियावाचूनही तरतील आता - मतला फार आवडला.

मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता? - हा शेरही आवडला.

धन्यवाद!

मला आवडलेला शेर :

आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता

समर्पक आणि शंकेला जागाच उरू नये असा पुरावा वाटतो.

उत्तम गझल.
राम क्रुष्ण हरी!!!

व्वा वैभवची जुनी गझल वर आणल्याबद्दल धन्यवाद... अजयला
वावरतील, थरथरतील, पाझरतील विशेष आवडलेले शेर

व्वा वैभवराव झकासच...
शेर अन शेर भावला....
अप्रतिमच.....

भन्नाट!!!!!बापू.