हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा

कृष्णधवल गोपिका पहाण्याचा गोडवा
हरवलाच रुखवती उखाण्याचा गोडवा

भाळावर घामाच्या चमचमत्या चांदण्या
सापटीत घुंगुरत्या गाण्याचा गोडवा

जांभळाच्या चविलाही आलाय साजणी
जांभळीच्या आड त्या... बहाण्याचा गोडवा

शिकलेल्या माणसाना शिकवावा मी कसा
रस्सा भुरकीत भात खाण्याचा गोडवा!

रापलेल्या शब्दानो या तुम्हा मिळेल, या
काळजात कृष्णेच्या पाण्याचा गोडवा.

धन्यवाद. राम कृष्ण हरी!!!

गझल: 

प्रतिसाद

ह. बा.

काही म्हणा! आपल्याकडे निराळे विषय आहेत अन भलत्याच नावीन्यपुर्ण पद्धतीने आपण ते मांडता. आपला वेग तर मलाही लाजवतो. :-))

या गझलेच्या बहुतेक सर्व शेरातील आशय आवडला. यती मेंटेन करावा लागत आहे वाचताना. जांभळाच्या चव्चा बहाण मस्तच!

जांभळाच्या चविलाही आलाय साजणी
जांभळीच्या आड त्या... बहाण्याचा गोडवा

व्वा.. क्या बात है... मस्तच.

डॉ.कैलास

बेफिकीरजी धन्यवाद!
कैलासजी धन्यवाद!

सर्वांच्या माहिती साठी:

रुखवती उखाणा: लग्नात जो रुखवत(खाण्याचे वेगवेगळे पदार्थ असलेला करंडा) आणला जातो तो उघडताना जुन्या जाणत्या महिला अर्धा अर्धा तास चालणारे पल्लेदार उखाणे घ्याय च्या. "आला आला रुखवत, त्यात हुता बटवा, नवरीला नटवा आन् सासरला पाठवा..." अशी सुरूवात होते आणि मग सगळ्या गावाचा उद्धार करून उखाण्याचा शेवट होतो.

सापटी: बैलाच्या मानेवर जो 'जू' अस तो त्याच्याशी बैलाला बांधण्यासाठी जी कातडी लांब दोरी असते ती म्हणजे सापटी. हौशी शेतकरी घुंगराच्या सापट्या वापरतात. म्हणून...
सापटीत घुंगुरत्या गाण्याचा गोडवा.

ही रचना लयीत वाटत नाही आहे आणि वृत्तही स्पष्ट होत नाही आहे. रचना तंत्रशुद्ध नसल्यास ती सावकाश विचाराधीन करण्यात येते.

मी उद्याच योग्य ते बदल करून पुन्हा पाठवतो. तंत्रशुद्ध नसल्यास लगेच विचाराधीन करावी ही विनंती. त्यासोबत, यातल्या नेमक्या चुका कुणी सांगीतल्या तर मला मदत होइल. विनंती.

वरील गझल चुकल्याने ही बदलेली रचना
रूखवतात हरवला उखाण्याचा गोडवा
या नावाने देत आहे. जाणकारानी मार्ग दर्शन करावे ही विनंती.

काचेच्या मॉलला ना, इराण्याचा गोडवा
रूखवतात हरवला उखाण्याचा गोडवा

बांधावर हरिणचाल झाले भलतेच हाल
सावजाला लागला निशाण्याचा गोडवा

जांभळाच्या चवितही ऊतरावा साजणी
जांभळीच्या आड त्या... बहाण्याचा गोडवा

गाईला अभंग अन् ज्ञान्याने लावला
संसारी वेड्याना शहाण्याचा गोडवा

खेळा तुमचे तुम्हीच पाण्याशी गोडीने
माश्याला नाही हो नहाण्याचा गोडवा

ह.बा.
आपल्या रचनेची लगावली स्पष्ट होत नाही.... वृत्त समजत नाही.

का चे च्या मॉ ल ला ना, इ रा ण्या चा गो ड वा
गा गा गा गा ल गा गा ल गा गा गा गा ल गा

रू ख व ता त ह र व ला उ खा ण्या चा गो ड वा
गा ल गा ल ल ल ल गा ल गा गा गा गा ल गा

द्विपदितील दोन्ही ओळींची लगावलि सारखी राहील हे पहा......ओळी लयीत म्हणता येते हे पहा....वृत्त कोणते हे वाटल्यास नंतर पहा....

दोन लघुंचे एक गुरु केल्यास चालते....पण तसे करुनही आपल्या या द्विपदी वृत्तात नाही आहेत.
असो....आपण लिहित रहा.

पु.ले.शु.

डॉ.कैलास

चालेल. आता आधि व्याकरणाची पुस्तके वाचून काढतो नंतरच लिहीतो.
शंका : एका ओळीत चोवीस मात्रा आणि सातव्या/त्याच रचनेत कधी आठव्या अक्शरावर (पण बरोबर बाराव्या मात्रेवर) यती अशा काही रचना मी वाचल्या आहेत.