...मनातच

धार्मिकतेच्या तटबंदीचा कोट मनातच...
विद्रोहाचा दारूगोळा...स्फोट मनातच...

सुंदर स्वप्नांच्या शापाने हुळहुळते जग...
चाटत बसते रोज मधाचे बोट मनातच...

केली नेत्यांनी गरिबांची चिंता जेव्हा..,
आशेनेही भरले त्यांचे पोट मनातच...

दांभिकतेचा, बेशिस्तीचा लोंढा आला,
विझवा सात्विक संतापाचे लोट मनातच

मौनामधुनी फुलवत जावे आठवणींना..,
स्वप्नांचीही बांधत जावे मोट मनातच...

डोळ्यांवरती झापड असते विश्वासाचे...,
दिसते कोठे..! मित्रांच्याही खोट मनातच...!

त्यांचे त्यांच्या लोकांशीही जमले नाही
प्रत्येकाने धरला गनिमी गोट मनातच

सवयीने मी घेतो आता थोडा थोडा
आकांक्षांच्याही नरडीचा घोट मनातच...

                                                - प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

प्रा. डॉ. संतोष,
विश्वासाचे झापड व आकांक्षांच्या नरडीचा घोट हे शेर उत्तम आहेत.
केली नेत्यांनी जेव्हा - या शेरात नेते कर्ते आहेत असा पहिल्यांदा भास होतो व त्यांचे पोट आशेने भरले असे भासते. 'आशेने भरले गरिबांचे पोट मनातच' असे केले तर सोपे वाटेल असा विचार मनात आला. यात गरीब हा शब्द दोनदा येत असला तरी ते उलट चांगलेच वाटेल असे वाटते. 
हे म्हणजे...असो...बाकी मी गप्प आहे.

छान...
दमदार  गझल. 
बोट, पोट, मोट, गोट, घोट  हे शेर फार आवडले. शुभेच्छा.

प्रदीपजी  यांच्याशी सहमत  आहे. 'खोट' सर्वाधिक आवडला.

गझल आवडली सर.
लोट, मोट आणि घोट हे शेर विशेष!!

सर्वप्रथम धन्यवाद.
आपण केलेली सूचनाही अगदी योग्यच आहे बरं का. पण आपण सांगितलेला दोष येवू नये म्हणूनच ('गरीब' ची पुनरुक्ती) ते टाळावं लागतं. मात्र गझलचा वाचक ते नक्की समजू शकतो असा विश्वास आहे. काही गोष्टी वाचक-रसिकाच्याही कुवतीसाठी ठेवाव्यात. गझल वा कविता रचनेतील सदोषता मला त्याहून महत्वाची वाटते. बाकी 'समीक्षक' अवघड लिहिलं (किंवा अप्रत्यक्षपणे सूचक लिहिलं) तर  'दुर्बोध' म्हणून आणि सोपं लिहिलं की 'बाळबोध' म्हणून हजेरी घेतातच. त्यामुळे एकतर रचना निर्दोष असावी आणि रसिकालाही कळावी आणि त्याचवेळी आव्हानात्मकही वाटावी. अर्थात, माझेच हेच म्हणणे मलाही दरवेळी पाळताच येईल असे नाही.
त्यावर लिहिण्याचं मी कबूल केलेलं आहेच.
असो. माझ्याबाबतीत तुम्ही गप्प राहण्याची गरज नाही. माझी स्वीकारक्षमता खूप आहे. अट फक्त एकच असते की, प्रतिसाद निखळ असावा. पूर्वग्रहदूषित, सुरेश भट म्हणत त्याप्रमाणे 'आधी ठरवून दिलेला' नसावा. त्याहीपुढे जावून केवळ दिखावू नसावा. 'कसा झोडला...' या प्रवृत्तीने दिलेला नसावा. मला वाटतं माझी ही अट फार गैरलागू नाही. त्यामुळे आपण अवश्य मला आपला मोकळा प्रतिसाद देत जा. माझा पत्ता, फोन्...काहीही मी लपवून ठेवलेलं नाही.

बाकी फार सांगणे नको.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनःपूर्वक धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनापासून....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

सुंदर स्वप्नांच्या शापाने हुळहुळते जग...
चाटत बसते रोज मधाचे बोट मनातच...
वाव्वा!!!!

खोट आणि गोट ही. संतोषराव, एकंदर चांगली झाली आहे गझल.

चित्तरंजन

आपली रदीफ वेगळीच आहे व सहज उच्चारताही येतीय. मधाचे बोट हा एक उत्कृष्ट शेर आहे. अक्षरशः बहुतेकांना तो स्वतःला लागू असल्याचे वाटेल. धन्यवाद!

अनेक दिवसांनी माझ्या गझलेवर आपण प्रतिसाद दिला. जाणकाराच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करणे गैर आहे काय? पण एक तक्रार आहे...कळवू का ? खरं म्हणजे  ती माझ्या काही प्रतिसादव्यवहारावरून आपणास वाचायला मिळाली असेल. माझी मते केवळ या संकेतस्थळाच्या प्रतिष्ठेसाठी कळकळीने लिहिलेली असतील त्याबद्दल खात्री असावी...काही अनपेक्षित गोष्टी घडतायत, हे आपण ध्यानात घ्यावे.
पुनःश्च धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनापासून....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

गझल अंतर्मुख झालेल्या कवीची व अंतर्मुख करणारी आहे. जीवनातील अनुभुतींना सक्षमपणे शब्दबद्ध केले आहे. प्रामुख्याने शेरांमधे एक निराशा जाणवते. मौन हा शेर वेगळा वाटतो.
दांभिकतेचा लोंढा आला - हा शेर संदेशवाही आहे.  एका सत्यवादी माणसाला कसे तोंड दाबून रहावे लागते हे ठळकपणे मांडले आहे.
एकंदर ही गझल उजवीच आहे.
 
केली नेत्यांनी गरिबांची चिंता जेव्हा..,
आशेनेही भरले त्यांचे पोट मनातच...

मौनामधुनी फुलवत जावे आठवणींना..,
स्वप्नांचीही बांधत जावे मोट मनातच...

डोळ्यांवरती झापड असते विश्वासाचे...,
दिसते कोठे..! मित्रांच्याही खोट मनातच...!

त्यांचे त्यांच्या लोकांशीही जमले नाही
प्रत्येकाने धरला गनिमी गोट मनातच

सवयीने मी घेतो आता थोडा थोडा
आकांक्षांच्याही नरडीचा घोट मनातच...
कलोअ चूभूद्याघ्या

गझल आवडली, विशेषतः -
धार्मिकतेच्या तटबंदीचा कोट मनातच...
विद्रोहाचा दारूगोळा...स्फोट मनातच...

सुंदर स्वप्नांच्या शापाने हुळहुळते जग...
चाटत बसते रोज मधाचे बोट मनातच...

मनापासून.....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०