जिंदगानी

वेळ सारा घेत गेली जिंदगानी
जायच्या वेळेत गेली जिंदगानी


माणसे नी माणसे नी माणसे बस
जे नको ते देत गेली जिंदगानी


नेमकी होताच इच्छा पूर्ण काही
लाच घेण्या येत गेली जिंदगानी


मी असावे मद्य किंवा भांगगोळी
हेलकावे घेत गेली जिंदगानी ( मतल्यात आलाय, चालते का? )


आमचे मन आमचा सम्राट आहे
आमची सेवेत गेली जिंदगानी


जात गेलो, जायचे होते न होते
ज्या ठिकाणी नेत गेली जिंदगानी


ही सुरू होणार की होणार नाही?
एवढ्या शंकेत गेली जिंदगानी


मी असावे गप्प, आली जिंदगानी
मी करावे बेत, गेली जिंदगानी


शोध लागे आज! ती गेली कुठे हा
सारखी आशेत गेली जिंदगानी


बायको नांवास रामाची, खरी तर
जानके, लंकेत गेली जिंदगानी


आत्महत्या शेवटी अंजाम आहे
ये, न येवो शेत, गेली जिंदगानी


ईश्वरा गावास वळसा, आणि कळसा
आमच्या काखेत, गेली जिंदगानी


सागराचा काठ माझी जिंदगानी
रेत आली, रेत गेली, जिंदगानी


ना मजाशी राहिली माझ्यात जेव्हा
ठेवुनी हे प्रेत, गेली जिंदगानी


 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

जात गेलो, जायचे होते न होते
ज्या ठिकाणी नेत गेली जिंदगानी

तसेच
हेलकावे घेत गेली जिंदगानी
ही आवडले.
घेत का चालणार नाही? दोनदा काय वारंवार चालेल.

पुढील शेराचा (विशेष करून दुस-या ओळीचा) अर्थ सांगाल का?

सागराचा काठ माझी जिंदगानी
रेत आली, रेत गेली, जिंदगानी

धन्यवाद समीर,
आपल्या प्रतिसादामुळे खूप आनंद झाला.
सागराची रेत - सागराची रेत जशी अत्यंत हलकी, साध्या एवढ्याश्या वार्‍याने इकडुन तिकडे जाते, तसे माझे जीवन अत्यंत कमी महत्वाचे आहे, कशाचाही त्याच्यावर प्रभाव पडतो व कशानेही त्याचे अस्तित्व संपू शकते असे हणायचे होते. आपल्याला माझ्या शब्दरचनेतून तो जाणवला नाही याबद्दल दिलगिरी!

जात गेलो, जायचे होते न होते
ज्या ठिकाणी नेत गेली जिंदगानी

ही सुरू होणार की होणार नाही?
एवढ्या शंकेत गेली जिंदगानी

सागराचा काठ माझी जिंदगानी
रेत आली, रेत गेली, जिंदगानी   हे ही छान.
आणखी एक : रेतीला खरी भीती सागराचीच असते. सागराच्या लाटेबरोबर रेती येते-जाते. रेतीने लोक काठावर घरे बनवितात. पण एकाच लाटेने ती उद्ध्वस्त होतात. आपले जीवन म्हणजे रेतीप्रमाणे ही उपमा सुंदर.
रेत आली, रेत गेली, जिंदगानी
कलोअ चूभूद्याघ्या

श्री अजय,
आपल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
आपले म्हणणे खरे आहे. रेतीला सागराचीच भीती असते. माझी खरे तर एक चूक पण झाली आहे. रेती हा शब्द मी रेत असा हिंदी पद्धतीने वापरलाय. मला त्यावेळेस या शेराची आठवण झाली होती.
तेज हवाने मुझसे पुछा
रेतपे क्या लिखते रहते हो?
आता मला वाटते आहे की माझा शेर त्या शेराच्या अनुवादासारखा झाला आहे. पण ज्यावेळेला रचला तेव्हा मला नक्कल करण्याची खरेच इच्छा नव्हती. अर्थात मुळात जिंदगानी हा शब्दच मराठी नाहीये.

मस्त आहे गझल.
सेवेत, हेलकावे, बेत हे शेर  फारच आवडले.
मलाही  एक शेर सुचलाय-
"ना  किनारा, ना तळाला गाठले मी,
शेवटी  नावेत  गेली  जिंदगानी...

ज्ञानेश,
धन्यवाद. आपला 'नावेत' हा शेर फार छान आहे. आपण 'नजरेत' व 'लेत' ( लेणे म्हणजे पहनना या अर्थी ) यावर दोन शेर रचावेत अशी विनंती.

'नजरेत' वर सुचते आहे, पण त्यात दम नाही. (लेत-कठीणच.)
पण अजून एक शेर सुचलाय-
"हास थोडे साजणी तू, ओळखीचे--
पाळुया संकेत.... गेली जिंदगानी !!"         किंवा,
"ठेवले मागे जरासे शब्द माझे,
पाळूनी संकेत, गेली  जिंदगानी..."
(अर्थात माझे हे शेर ठिगळासारखे आहेत, असे अनेक करता येतील. मूळ रचनाच उत्कृष्ट आहे.
जे उत्फूर्त तेच अस्सल असते, याची नम्र जाणीव आहे...)

आमचे मन आमचा  सम्राट आहे

आमची सेवेत गेली जिंदगानी



हा शेर आवडला




बर्‍याच कल्पना परत परत आलेल्या आहेत त्यामुळे गझलेच्या बांधणीनुसार प्रतिसाद देतो आहे. मूळ कल्पनांनुसार नव्हे. सुरेशभटांचे काही शेर आठवले -
मनासारखे जगावयाचे किती किती खास बेत होते..
पडताळा -
...
ज्या ठिकाणी नेत गेली जिंदगानी
...
मी करावे बेत, गेली जिंदगानी

बाकी राम, कळसा, प्रीत, आशा हे शेर नसते तर बरे झाले असते.