अशी गोड तू...

अशी गोड तू...

फुलांनी पुन्हा आज लाजून जावे, अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे, अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे, अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दंवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू...

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

जणू धन्य माता तुझी जाहली,जन्म देता तुला;
पित्याने तुझ्या सार्थ गर्वात न्हावे, अशी गोड तू...

तुझा सावळा रंग माया करे, पांडुरंगावरी;
तुला वंदण्या, मी तुकाराम व्हावे, अशी गोड तू...

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...

कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...

शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

तुझ्या वर्णनाचे, महाकाव्य वाचून होता प्रिये;
जनांनी महाभारताला भुलावे, अशी गोड तू...

तुझ्या दर्शनाला, सये रांग आहे, किती लागली!
अता चालणे बोधिवृक्षास यावे, अशी गोड तू...

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

मला स्पर्श साधा, तुझा भासतो, 'अमृता'च्यासवे;
'तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?' अशी गोड तू...

कधी गुंफतो मी नभाशीच, आभास माझे-तुझे;
तुझ्या आठवांना सदा मी स्मरावे, अशी गोड तू...

तुझ्या अंतरी नांदते खुद्द साक्षात वागेश्वरी;
तुला रोज पंचारती ओवळावे, अशी गोड तू...

तुझे रूप पाहून हरखून जाती, सुगंधी कळ्या;
अता सांग त्यांनी कसे गं फुलावे? अशी गोड तू...

तुझी याद येताच ओलावते ही, पुन्हा पापणी;
सये अश्रुबिंदूत मोती गळावे, अशी गोड तू...

कशी आवरू या उपाशी मनाची, कवाडे जुनी;
पुन्हा प्रेम माझे उसंडून यावे, अशी गोड तू...

तुझ्या लोचनी राहण्याचा सखे, मोह टाळू कसा?
तुझ्या भोवती विश्व माझे फिरावे, अशी गोड तू...

जगाला अता भासतो मी, तुझा रंगकारी जरी;
खरे रंग माझे मला ना कळावे, अशी गोड तू...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या, जन्म संपून जावे, अशी गोड तू...

तुला प्राप्त करण्यास, आरंभला मी महायज्ञ हा;
अनादी-अनंता तुझा मी बनावे, अशी गोड तू...

- निरज कुलकर्णी.

गझल: 

प्रतिसाद

निरज, तुझी  ही  गझल  मी  निदान  ५० वेळा  तरी  वाचली असेल याआधी !
आता ५१व्या वेळीही  तितकीच  आवडली... जाम खुश  झालो.

नये रे, नये असे करू!
आधीच मधुमेहावर रामबाण उपाय नाही. त्यात ती २६ शेर रचण्याइतकी गोड. नको आणू तिला इथे. मला माहितीय, अजून जवळ जवळ ४४ शेर तू लपवूनच ठेवले आहेस की नाही? ऑ? कसे पकडले? वृत्त नाही सांगीतलस या वेळी? मात्राही नाही सांगीतल्यास? बरे झाले!
पण छान आहे वर्णन तसे, फक्त 'गझल की कविता' या विषयावर माझे व्याख्यान असते त्याला येत जा.
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का? 

ही बघ! अशी असते गझल! या ज्या ओळी आहेत त्यांना गझलेच्या ओळी म्हणता येईल.
'हां अता नाहीस तू ही खंत आहे
ठीक आहे पण तसे एकंदरीने'
'लावुनी धरलेस तू आयुष्यभर ते
बोललो होतो कधी जे मस्करीने'
हे वाचले किंवा ऐकले की कसे वाचकाला किंवा श्रोत्याला वाटेल की नाही की अरे हो, असेच कुणीतरी आपलेही होते बर का? किंवा आपले नसले तरी कवीच्या मनस्थितीची संपूर्ण जाण येऊन तरी दाद निघतेच की नाही? अत्यंत कमीतकमी शब्द, साधे शब्द, नेहमीच्या बोली भाषेतले शब्द. पण मुद्दे? मनाला स्पर्श करणारे. हो की नाही?
मला तुझी रचना आवडली, पण गझलियत इज मिसिंग!

मधुर बाण! प्रेमयुद्धात उपयोगी पडतात. चालवत रहा, चालवत रहा!

फिदा व्हावे, अशी रचना.
एक सूचना
यातील केवळ अकरा सुंदर शेर निवडून , संपादनाने सफाईदारपणा आणून एक नितांतसुंदर रचना करावी. 

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...
जगाला अता भासतो मी, तुझा रंगकारी जरी;
खरे रंग माझे मला ना कळावे, अशी गोड तू...
तुझ्या लोचनी राहण्याचा सखे, मोह टाळू कसा?
तुझ्या भोवती विश्व माझे फिरावे, अशी गोड तू...

कलोअ चूभूद्याघ्या