रूक्मिणी...

रूक्मिणी...

तो मनाला सांजवेळी, भावना देऊन गेला...
आठवांचे स्पंद सारे, जागते ठेवून गेला...

मी कसे सांगू सख्याला, काय या ओठात आहे?
माझिया डोळ्यांतुनी तो, तारका वेचून गेला...

गाजली मैफील त्याची, आज सार्‍या आसमंती;
तो निशेला भारलेली, भैरवी गाऊन गेला...

संयमाचे गंजलेले, बंध मी पाळू कशाला?
आजला श्वासात माझ्या, श्वास तो माळून गेला...

जाहले राधा कधी मी, जाहले मीरा तयाची;
तो हरी मज बावळासा, रूक्मिणी बनवून गेला...

- निरज कुलकर्णी.

वृत्त - व्योमगंगा

गण - गालगागा गालगागा गालगागा गालगागा

मात्रा - २८
गझल: 

प्रतिसाद

नीरज?
असे करू नये.
गझल म्हणजे काय ते वाच.
१. गझल ही मनातील अत्यंत नाजूक, तरल भावनांची मांडणी  असते.
२. तशा भावना खरे तर सगळ्यांमधेच असतात, पण विचार मांडण्याची पद्धत गझलेत अशी असते की नैसर्गीक वाह वाह उमटली पाहिजे. ऐकणार्‍याला आपण स्वतः व्यक्त झाल्यासारखे वातले पाहिजे.
३. वरील कारणांमुळे गझलेत प्रामुख्याने दु:खाला स्थान मिळते, जरी ते आवश्यक नाही.
४. शेरामधील दोन ओळींचा संबध हा सरळ सरळ जाणवलाच पाहिजे. जसे कातरवेळी भावना अनावर होतात म्हणुन उगाचच कातरवेळ घेऊ नये तसे उगाचच डोळ्यातल्या तारका वगैरे घेऊ नयेत.
५. सर्वात महत्वाचे - गझलेत कवीचे स्वतःचे मनोव्यापार प्रामुख्याने असतात, तरीही त्यांची मांडणी, शब्दरचना अशी असते की त्यावर नुसता एक शेर ऐकून रसिक फिदा झाला पाहिजे. नाहीतर निसर्गवर्णन, श्रुंगारवर्णन ऐकून कोणीही वा म्हणेल, पण तुझ्या अनुभवांच्या मांडणीला वा मिळाली पाहिजे. ( या निकषाप्रमाणे माझी 'असे करू नये १' ही रचना मतल्यातच निकालात निघते. पण कवी वेगळा, मूल्यमापक वेगळा, रसिक वेगळा, समीक्षक वेगळा ! )
उदा: 
कम होंगे इस बिसातपे हम जैसे बदकिमार
जो चाल हम चले सो निहायत बुरी चले - जौक
बैठने कौन दे है फिर उसको
जो तेरे आस्तॉसे उठता है - मीर
खानाएदिलसे युं जिनहार न जा
कोई ऐसे मकॉसे उठता है - मीर
अशऑर मेरे यु तो जमानेके लिये है
कुछ शेर फकत उनको सुनानेके लिये है - जॉनिसार अख्तर
ए अजल एक दिन तुझे आना जरूर है
आज आती शबे-फुर्कतमे तो एहसां होता - मोमीन