यज्ञपर्व ...( गझल )

यज्ञपर्व ... ( गझल )

डोळ्यांत सांजवेळी, आभास पेटलेले...
ओल्या उरात माझ्या, निश्वास गोठलेले...

वेड्या मनास माझ्या, चाहूल लागलेली;
येणार आजला तू, काळीज बोललेले...

झाली सखे तयारी, संपूर्ण स्वागताची;
मी मुग्ध 'केतकी'ला, श्वासात माळलेले...

आरास भावनेची, नैवेद्य आठवांचा;
मंदीर 'अमृता'चे, ह्रदयात रेखलेले...

नैमित्यमात्र होते, हे पादक्षालनाचे;
पाण्यात त्या जणू होते, तीर्थ भारलेले...

आसन तुला दिले मी, या लुब्ध पापण्यांचे;
तू स्पर्श त्यांस करता, हे नेत्र धुंदलेले...

मी आद्यगीत गाता, हा काळ स्तब्ध झाला;
मी छेडले ऋचांचे, ते शब्द मंत्रलेले...

समिधा म्हणून माझ्या, कविताच जाळल्या मी;
करपून शब्द माझे, राखेत साठलेले...

हा यज्ञ पूर्ण झाला, फल प्राप्त हेच झाले;
मी शेवटी तुलाही, गझलेत बांधलेले...

हे यज्ञपर्व माझे, याला रदीफ नाही;
आनंदकंद आहे, हे वृत्त मांडलेले...

- निरज कुलकर्णी

वृत्त - आनंदकंद

गण - गागालगा लगागा गागालगा लगागा

मात्रा - २४
गझल: 

प्रतिसाद

फारच छान गझल, अप्रतिम!!!
सगलेच शेर  अतिशय सुन्दर आहेत.