ध्यास मला (काही शेर...)

नवाच लागे ध्यास मला
हवा सुखाचा घास मला

असो कसेही जीवन हे
जगण्याचा हव्यास मला

जगावया श्वासापुरते,
पुरे तुझा विश्वास मला

गुलाब आणिक गंध जिथे
तुझाच होई भास मला

अधांतरी हा जीव फसे
मनोरथांचा फास मला

अनोळखी आहोत जणू..
नको असा सहवास मला

निघून मी गेल्यावर तू..
खुशाल दुनिये हास मला

पुन्हा पुन्हा स्वप्नात कसा
पुकारतो मधुमास मला..?

नको कुणाचे सांत्वनही..
उगाच होई त्रास मला...

जमीन माझी कसेन मी..
पडो किती सायास मला

सदैव मित्रा तूच दिसे
तयार संपवण्यास मला

जमाव शत्रूंचा जमला
अखेर सावरण्यास मला

- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

अधांतरी हा जीव फसे
मनोरथांचा फास मला
वा...वा...
अनोळखी आहोत जणू..
नको असा सहवास मला
छान...
निघून मी गेल्यावर तू..
खुशाल दुनिये हास मला
सुंदर...
सदैव मित्रा तूच दिसे (दिसतोस)
तयार संपवण्यास मला
शुभेच्छा..

जमीन माझी कसेन मी..

पडो किती सायास मला

संतोष सर,

सदैव मित्रा तूच कसा..?
- तयार संपवण्यास मला

बदल किरकोळ आहे. ठीक वाटतो का ?
 

गंमत सांगतो, प्रत्यक्षात तिथे 'कसा' हाच शब्द मलाही अपेक्षित होता. अक्षरश: खरं वाटणार नाही. पण आपण प्रश्नच फार विचारतोय असं वाटल्यानंतर मी ऐनवेळी बदल केला. पण आपण सुचवलेला बदल मी स्वीकारतो आहे आणि त्याचे श्रेयही तुम्हाला देतो आहे. धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

असे करू नये.
आता तंत्र मंत्र या विषयावर बोलावे लागणे चांगले आहे का?
कविता व गझलमधे मोठ्ठा फरक आहे.
ध्यास मला ही कविता आहे. गझल म्हणजे :
१. शेर ऐकून परिस्थिती समोर उभी राहिली पाहिजे.
२. त्या परिस्थितीमध्ये रसिक स्वतः गुंगला पाहिजे.
३. शायराची परिस्थिती व/किंवा मांडणी बघुन रसिकाच्या मनात नैसर्गीकरीत्या दाद निर्माण झाली पाहिजे.
४. पहिल्या ओळीनंतर दुसर्‍या ओळीत काय सांगीतले जातेय याची उत्सुकता वाटायला पाहिजे.
५. खूप सर्वसामान्या विधानांच्या ऐवजी काहीतरी विशिष्ट मुद्दा असल्यास गझल उंचीवर जाते. याचे उदाहरण म्हणजे:
असो कसेही जीवन हे
जगण्याचा हव्यास मला
हे अत्यंत सामान्य विधान आहे की नाही?
आता हे बघा:
**चहा घेऊ, बसू बोलत
**जीवनाच्या लंबकाला - दे तुझा हळुवार झोका नेहमीचा
**एकंदरीने गझलेतील बहुतेक शेर
** जुने विसरून गेलेले मधील बहुतेक शेर ( चितेचा सोडून )
** कसा करावा या भयगंडाचा निचरा मधील काही शेर
** टाहो मधील काही शेर.
६. शेर लक्षात राहिला पाहिजे.
७. शेराने नशा यायला पाहिजे.
असे करू नये. गझल म्हणायचे अन कविता करायची म्हणजे यंदा आमच्या सुंदर मुलीचे कर्तव्य आहे असे सांगून ऐनवेळी बोहल्यावर कुरूप मुलगी उभी करण्यासारखे आहे की नाही?
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणून येतो. बर का?
 

असे मान्य आहे. आपला कोणताही चोखंदळ व विशेष म्हणजे प्रामाणिक प्रतिसाद शिरसावंद्यच. मात्र, असे कधी कधी होते. करायचे नसूनही होते. मात्र त्याबाबतीतही एक अवस्था असे करायला लावते हेही मान्य असावे. माझ्याबाबतीत ते घडले खरे. धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

सोपे पण सुंदर बाण! बाणांत सातत्य! नादमयता! काही बाण विजयी बाण!

माफ करा. पण प्रतिक्रियेत कसल्या प्रतिमा हो ? सरळ सरळ लिहा बुवा. मला समजू शकले. पण मी साधेपणा माझ्या स्वभावातही कष्टाने जपला आहे. असो. पण धन्यवाद तर दिलेच पाहिजेत. धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

प्रा. डॉ. संतोष,
असे करू नये.
आपण बोलता बोलता एका अत्यंत महत्वाच्या मुद्याला हात घातलात, असे न करता तो मुद्दा सरळ गझलचर्चा येथे लिहायला हवा होतात.
किती छान म्हंटलेत! एक अवस्था तसे करायला लावते.
ही जी अवस्था असते ती काव्यप्रक्रियेची जननी असते. इथुन ती प्रक्रिया सुरु होते. मग कवी  आणखीन खयाल शोधतो, वृत्त शोधतो, गझल असेल तर काफिया, रदीफ शोधतो. हळुहळु एक छान निर्मीती प्रकाशात येते. वाह!
काव्यप्रक्रिया हा एक वेगळा विषय असे मानून हवे तर सोडून देऊ. पण त्या अवस्थेबद्दल बोलणे हे एकंदरच कवितेसाठी व त्यातल्यात्यात गझलेसाठी फार पोषक ठरेल.
ही अवस्था का निर्माण होते? एखाद्या घटनेने? एखाद्या माणसाला पाहुन्?आपल्या जेनेटीक रचनांमुळे? ( म्हणजे अशा अवस्थेत आपण कविता करतो, दुसरा कुणी संगीत ऐकेल किंवा जुगारही खेळेल, म्हणजे आपण जन्मजात कवी प्रवृत्तीचे असल्यामुळे?), आपल्याला आधीपासुन कवितेचे आकर्षण असल्यामुळे? आपल्याला व्यक्त व्हायला कविता आधारभूत ठरते असे वाटल्यामुळे? कविता ( यात गझलही आलीच ) रचून आपल्या रिलॅक्स झाल्यासारखे वाटत असल्यामुळे? आपल्याला कवी म्हणुन समाजात मिळणारी ओळख हवीहवीशी वाटत असल्यामुळे?
प्रा. डॉ. संतोष,
ही अवस्था कशी निर्माण होते याचा अभ्यास केला की कविता खूप उंचावर नेता येते.कारण निर्मीतीचे मूळ कारण कळले की ते ठळकपणे उद्धॄत करता येते. माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपल्या अशा अवस्थेचे मूळ आपण शब्दांत मांडावेत. त्यातून फार उद्बोधक मुद्दे निघतील.
धन्यवाद!

अवश्य लिहीन. आपण याची 'गझलचर्चा' अवश्य करू. थोडा वेळ लागेल. कृपया, थोडा धीर धरावा आणि मलाही सवलत बहाल करावी.  तूर्तास इतकेच म्हणेन -
जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती..?
सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती...! (अर्थात - सुरेश भट)
कवितेचेही तसेच ...(त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी जीवन आणि कविता वेगळ्या नाहीत)..
धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

नवाच लागे ध्यास मला

हवा सुखाचा घास मला
असो कसेही जीवन हे

जगण्याचा हव्यास मलाअनोळखी आहोत जणू..

नको असा सहवास मला.. हे शेर विशेष आवडलेत..'अनोळखी' मुळे
फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था,
सामने बैठा था मेरे, और वो मेरा न था... हा शेर आठवला
-मानस६

फार वेगळ्या मानसिकतेत ही गझल झालेली असल्यामुळे मात्र त्यावर फार आक्षेपाचे प्रतिसाद आल्यामुळे मी थोडा विचलितही झालो होतो. आपल्या प्रतिसादामुळे आनंद वाटला. मनापासून धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०