टाहो...

घेऊन मी तुला रे सजवीन रात माझी..
पण तू नको विचारू केंव्हाच जात माझी


जेंव्हा कुणा मिळाले ते जातकूळ सारे..
राती अनेक सजल्या सोडून बात माझी


चौकात त्यागला मी.. हा व्यर्थ देह अंती..
तेंव्हा कुठे निघाली ! ...  पहिली वरात माझी


पाठीवरी वळांचे पाहून रंग आता...
कळले कि मीच केली गणना गुरात माझी


जे जे हुशार होते, ते ते पसार होता...
मी ही तयार झाले टाकून कात माझी


माझेच नाव जेंव्हा सा-या मुखांत होते...
पाळेमुळेच तुटली कोलाहलात माझी


गर्भात फोडला मी टाहो पुन्हा पुन्हा रे...
अन् शांत जगत् झाले विझवून वात माझी

गझल: 

प्रतिसाद

वाह!
चौकात त्यागला मी.. हा व्यर्थ देह अंती..
तेंव्हा कुठे निघाली ! ...  पहिली वरात माझी
गर्भात फोडला मी टाहो पुन्हा पुन्हा रे...
अन् शांत जगत् झाले विझवून वात माझी
क्या बात है!
छान जमली गझल!

मलाही आवडली. समजणार्या पद्धतीने छान लिहिले आहे.
मात्र
जे जे हुशार होते, ते ते पसार होता...
मी ही तयार झाले टाकून कात माझी
याचा संदर्भ लागला नाही.

भन्नाट.....

डॉ.कैलास

खुप छान. टाहो आवडले.

वा: अप्रतिम गझल!
चौकात त्यागला मी.. हा व्यर्थ देह अंती..
तेंव्हा कुठे निघाली ! ... पहिली वरात माझी

गर्भात फोडला मी टाहो पुन्हा पुन्हा रे...
अन् शांत जगत् झाले विझवून वात माझी

हे शेर तर भन्नाटच! (शेवटच्या ओळीत 'अन् शांत विश्व झाले' असं केलं तर सहज वृत्तात बसेल.)

पहिले दोन शेर नीटसे कळले नाहीत.

जेंव्हा कुणा मिळाले ते जातकूळ सारे..
राती अनेक सजल्या सोडून बात माझी

पाठीवरी वळांचे पाहून रंग आता...
कळले कि मीच केली गणना गुरात माझी
.... खुप आवडले..!!

फाटक साहेबांशी सहमत आहे. टाहो शेर खास जमलाय!

वा वा! सर्वांना धन्यवाद!

ऋत्विक,
पहिले दोन शेर नीटसे कळले नाहीत.
काही काळाने कळतील आपोआपच....:)