...कुठे बेत आहे?

 


कोठली ही हवा माझ्या घरी येत आहे?
आज ओढून तुजपाशी मला नेत आहे


तू मला प्रश्न नाही घातले - पण तरीही
मी कशाला उगीचच उत्तरे देत आहे?


का तुला लाभतो आराम ऊन्हात माझ्या?
कोणता रे तुला हा ताप छायेत आहे?


हा दिपस्तंभ का करतो दिशाभूल माझी?
सांग त्याला - 'कुणी अस्वस्थ नावेत आहे'


काल कॉलेजला तर जायला तू निघाली
मग कशी आजही माझ्याच शाळेत आहे?


का पुन्हा तू अशी आलीस सोडून सारे?
आज माझा जगायाचा कुठे बेत आहे? 

गझल: 

प्रतिसाद

ही पण छान गझल आहे.
[प्रतिसाद संपादित-विश्वस्त]

काय बरोबर? : न्हात, दिपस्तंभ  असे की.... न्हात, दीपस्तंभ असे?
जाणकारांनी जमल्यास मत द्यावे. (हृषीकेश सहीत)

कॉलेज शब्द गझलेत समजा अगदी म्हणजे तसा टाळावासा वाटलाच तरः
काल गेली महाविद्यालयाला तरी ती
का बरे आज माझ्या ती प्रशालेत आहे?
यात तू गेली च्या ऐवजी तू गेलीस हे न घेता येण्याचा प्रश्नही उरत नाही.
बाकी आपली इच्छा!  वाटले ते लिहिण्याचा मोह टाळता आला नाही याबद्दल माफ करा.
या शेराचा अर्थही सांगितलात तर बरे होईल.
 

असे करू नये.
प्रिय मित्र चुरी,
असे करू नये. गझल हा संवाद आहे.त्याच्यात एकाने दुसर्‍याला काहीतरी सांगणे आहे. आपलेच आपण बोलायचे हे विचित्र दिसते की नाही? म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणुन भाषणाला उभे राहून स्वगत म्हणण्यासारखे आहे की नाही?
जरा जास्त स्पष्ट करतो बर का?
आता उगीचच उत्तरेछायेत ताप हे शेर कुणाला उद्देशून आहेत सांगा बरे.
तसेच कॉलेज व दीपस्तंभ या शेरांचा अर्थ काय सांगा बरे. तुम्ही रचलेत म्हणजे तुम्हाला माहितीच असणार. आता सगळ्यांनाच समजू देत. हो की नाही? दीपस्तंभ कशी काय दिशाभूल करतो? बर करतो तर करतो पण नावेत कुणीतरी अस्वस्थ का आहे?
मला हे मान्य आहे की सध्या ऍडमिशनचे फार प्रॉब्लेम्स आहेत. कदाचित तिला कॉलेजमधे नसेल प्रवेश मिळाला, त्यात एवढे काय? एकदम गझल करायची? प्रेमही असेल तिचे कदाचित खूप. म्हणुन अकराव्वीला शाळेतच घेतला असेल तुमच्या प्रवेश! आणखी एक! मित्र जर नापास वगैरे झाला तर बिचारी करणार काय? आली असेल शाळेत. असे करू नये एकदम गझल वगैरे! सर्वजण आपापल्या दैवाप्रमाणे चालतात.
मी आपला या साईटवर येतो म्हणजे काय की हे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन!
बर का?
 
 
 

अजयदा!!
हे दोन्ही शब्द मी चुकीचे लिहीले आहेत.
उन्हात आणि दीपस्तंभ बरोबर आहे
मनापासून माफी मागतो
लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद!!!

अजयदा!!
हे दोन्ही शब्द मी चुकीचे लिहीले आहेत.
उन्हात आणि दीपस्तंभ बरोबर आहे
मनापासून माफी मागतो
लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद!!!

भूषणदा!
तुमची रचना चांगली आहे.
मी देखील, गेली आणि गेलीस वर विचार करीत होतो.

भूषणदा!
शेराचा अर्थ असा की,
ती जरी सांगते मी तुला सोडून गेली (माझ्या प्रेमाहून सुंदर काही शोधण्यासाठी),
पण अजूनही माझ्यातच गुंतली आहे.

मित्र तीलकधारी,
आपण म्हणता त्याप्रमाणे गझल हा संवाद आहे.
पण संवादामध्ये आपला आनंदच सांगणे नसतं.
त्यात आपल्याला झालेलं दु:ख ही सांगीतलं जातं,
त्याचप्रमाणे चांगलं असो वा वाईट आपल्याला जे वाटतं
तेही सांगू शकतो. मग ते सांगणं कुणाला आपल्याबाबत घडल्यासारखं वाटेल किंवा वाटणारही नाही.
पण ज्याने त्याने आपल्याला चांगले वाईट जाणवलेले सांगीतले पाहिजे.
गझलेत सर्व प्रकारच्या भावनांना स्थान आहे असे मला वाटते (निदान आत्तापर्यंत माझा तसा समज आहे).
आपल्याला जाणवलेले सांगणे म्हणजे मी मी करणे नव्हे, तर ज्याप्रमाणे दु:ख सांगीतल्याने कमी होते
त्यातलाच हा प्रकार समजावा.

आत्ता शेरांच्या अर्थां संबंधी -
'उगीचच उत्तरे' - कधी कधी आपण केलेल्या चुकीची माफी कशी मागावी (किंवा समर्थन कसे करावे) हे कळत नाही.
त्याच वेळी कुणा आपल्या माणसासमोर कबूल करावयाचे असेल तर अधीकच बिकट प्रसंग येतो.तेव्हा जे सैरभैर उत्तरे आपली येतात त्यांबद्द्ल
मी सांगीतले आहे.

'छायेत ताप' - जग कितीही सुंदर सुखमय असलं तरी, जिथे आपलं म्हणणारं कुणी नाही तिथे आपलं मन रमेल का?
म्हणूनच आपल्या माणसाकडे जरी दारिद्र्य दु:ख असलं तरी त्याचे ते 'ऊनच' प्रिय वाटते

'दीपस्तंभ' - काही माणसांना जग मार्गदर्शक म्हणून मान्यता देते आणि हा विश्वास ठेवते की ते योग्य तो मार्ग दाखवतील.
मात्र असे सर्वच मार्गदर्शक विश्वासार्ह आहेत का? (उदा. केवळ व्यवसाय, कमवायचे साधन म्हणून पाहणारे शिक्षक)
 येथे नावेतले अस्वस्थ सर्व संकटात सापडलेले आहेत.

वरील शेरांत ऊन,छाया, दीपस्तंभ वगैरे शब्द प्रतीकात्मक आहेत.

धन्यवाद!!!!