...हे नसे थोडके !

........................................
...हे नसे थोडके !
........................................


घुमे आज प्राणातुनी बासरी....हे नसे थोडके !
रुळू लागले गीत ओठांवरी... हे नसे थोडके !


तुझ्या जीवनातून बाहेर गेलो जरी फेकला ....
मनाची तुझ्या लाभली ओसरी...हे नसे थोडके !


नभा, श्रावणाची अपेक्षा कधी ठेवली सांग मी ?
मिळाल्या मला फक्त काही सरी...हे नसे थोडके !


पुन्हा भेट होईल, होणार नाही...न झाली तरी...
स्मृती गोड काही तुझ्या अंतरी...हे नसे थोडके !


मने एक होतील याची न खात्री, न काही हमी...
तरी सांधली जात आहे दरी...हे नसे थोडके !


खुलासा कधीही न केला, न काहीच मी बोललो...
तुला मौन माझे समजले परी...हे नसे थोडके !


मला आत कोणी न येऊ दिले वा न जाऊ दिले...
अखेरी मिळाली मला पायरी...हे नसे थोडके !


भुकेजून गेलो, असे मी स्वतःला म्हणावे कसे ?
दिसे रोज चित्रातली भाकरी...हे नसे थोडके !


मला खंत नाही, घरी किर्र अंधार माझ्या जरी...
दिवा तेवतो दूर कोठेतरी...हे नसे थोडके !


- प्रदीप कुलकर्णी


 


 

गझल: 

प्रतिसाद

दुसरा शेर बाण आहे.

साकल्यपूर्ण आणि अनाकलनीय...असे दोन्ही प्रकारचे प्रतिसाद देणाऱ्या कवींचे / काव्यरसिकांचे मनापासून आभार.

वेगळ्या अन्त्ययमकाचा उत्तम निभाव, तसेच ओळींमधला सफाईदारपणा-ओघवतेपणा, प्रासादिकता आणि बोलकेपणा ही तुमच्या गझलेची वैशिष्ट्ये इथेही ठळक आहेत. ह्या गोष्टी अनुकरणीय आहेत.

सगळेच शेर आवडले (म्हणजेच गझल आवडली) हेवेसांनल.

पण

खुलासा कधीही न केला, न काहीच मी बोललो...
तुला मौन माझे समजले परी...हे नसे थोडके !

मला आत कोणी न येऊ दिले वा न जाऊ दिले...
अखेरी मिळाली मला पायरी...हे नसे थोडके !नभा, श्रावणाची अपेक्षा कधी ठेवली सांग मी ?
मिळाल्या मला फक्त काही सरी...हे नसे थोडके !मला खंत नाही, घरी किर्र अंधार माझ्या जरी...
दिवा तेवतो दूर कोठेतरी...हे नसे थोडके !हे शेर विशेष.

मि. प्रदीप,
आपली ही गझल नृत्य बसवण्याच्या पात्रतेची आहे. अत्यंत लयबद्ध्पणे ती उच्चारता येते. सहज शब्दरचना आणि सहज म्हणता येईल अशी लय! मौन आणि दिवा तेवतो हे शेर टेरिफिक! आपल्या या गझलेतील मुळात विषयच वेगळे आहेत. Enjoyed reading! Thank you.

खुलासा कधीही न केला, न काहीच मी बोललो...
तुला मौन माझे समजले परी...हे नसे थोडके !

भुकेजून गेलो, असे मी स्वतःला म्हणावे कसे ?
दिसे रोज चित्रातली भाकरी...हे नसे थोडके !

मला खंत नाही, घरी किर्र अंधार माझ्या जरी...
दिवा तेवतो दूर कोठेतरी...हे नसे थोडके !
विशेष वाटले. शेर काळानुरूप चपखल.

गझल फार आवडली! अर्थपूर्ण आणि प्रासादिक काही वाचावसं वाटलं की खुशाल प्रदीपजींची कुठलीही गझल उघडावी!!!
पायरी, दिवा आणि सरी हे शेर तर अप्रतिम आहेत!!

तुझ्या जीवनातून बाहेर गेलो जरी फेकला ....
मनाची तुझ्या लाभली ओसरी...हे नसे थोडके

सुंदर !

गझल प्रदीप!
 

प्रदिप,
नेहमी प्रमाणेच दमदार गझल.. आवडली हेवेसानला..:)

अनिरुद्ध
 

अर्थपूर्ण आणि प्रासादिक काही वाचावसं वाटलं की खुशाल प्रदीपरावांची कुठलीही गझल उघडावी!!!

संपूर्ण सहमत आहे.