विचारू नका रे

तिचे नाव कोणी विचारू नका रे
अशी लाजते की विचारू नका रे


असे प्रश्न साधे करी सादगीने
पुढे घेत वेणी विचारू नका रे


मला चांदणे भोवती रोज लाभे 
अशी हासते की विचारू नका रे


नशा, संकटे, हाल, घेऊन येई
तिची अंगडाई विचारू नका रे


मुलायम मुलायम कारणे सांगुनी
अशी भेट टाळी विचारू नका रे


 

गझल: 

प्रतिसाद

नवा रदीफ आवडला.

मुलायम मुलायम कारणे सांगुनी (इथे अक्षर गण वॄत्तची लय बिघडली आहे, जरा तपासा )
अशी भेट टाळी विचारू नका रे
*मुलायम मुलायम किती कारणे ती ? हा बदल भुजंग प्रायत प्रमाणे चालू शकेल

सन्माननीय ६४,
धन्यवाद. कृपया सांगत रहा. आपले पाऊसवरील विचारही पटले.
 

श्रीमान भूषण,

मी असे मानतो की एखाद्या विषया बाबत भिन्न मते असणे, चर्चा, वाद-विवाद ही सगळी विद्वानांची लक्षणे आहे. पूर्वीच्या काळी विद्वान मंडळी एखाद्या मुद्यावर मत भिन्नता असल्यास एकमेकांना चर्चेचे आव्हान देत असत. एखाद्याने अमूक एक गोष्ट चूक आहे किंवा फारसे योग्य नाही असे सांगितले आहे तर तो असे का म्हणतो आहे हे प्रथम बघायला हवे. कादाचित आपण बरोबरही असू शकतो व सांगणारा चूक असू शकतो. त्या मुळे सुचवलेले बदल का सुचवले आहेत हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. यादगार यांना त्यांच्या एका गझलेत मी बदल सुचवलेले दोन शेर पसंत पडले. पण उलट एका शेरात मी त्यांना सुवलेला बदल योग्य का होत नाही हे त्यांनी मला पटवून दिले व त्यामुळे अजूनही त्या शेरात काय बदल करता ये ईल ? असा मी विचार करत आहे.
एखादा बदल मान्य नाही असे एखाद्याने सांगितले तर पुढे चर्चा लांबवण्यात अर्थ नाही पण बदल सुचवणारा काय म्हणतो त्याचा विचार जरूर करावा. बदल मान्य केला म्हणून बदल मान्य करणारा अज्ञानी ठरत नाही. तसेच योग्य बद्ल सुचवला म्हणून सुचवणारा फार विद्वान असतो असे नाही. बदल सुचवणे, सूचना करणे ही फक्त विचारांची देवाण घेवाण आहे. ही देवाण्-घेवाण करताना काय आणि घ्यायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
या संकेत स्थळासाठी काम करणारे लोक आपापली कामे, जबाबदार्‍या, दिनचर्या सांभाळून आणि त्यांच्या पदरचे पैसे खर्च करून हे संकेत स्थळ सभासदांसाठी विनामूल्य सेवा म्हणून चालवतात. त्या मुळे एखाद-वेळी नजर चुकीने जर काही समस्या झालीच तर तो काही मोठा घोटाळा नाही इतके लक्षात घेतले तरी पुरे. या *वेबसाईट वरून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जात नाहीत व हे एखाद्या *बॅंकेचे किंवा *ऑनलाईन खरेदीचे संकेत स्थळ नाही जिथे ग्राहक संकेत स्थळाच्या व्यवस्थापनाला जाब विचारायला जाऊ शकतात.