प्रश्न

-गझल-


माणसे नसतात जेव्हा , भावना असतात का रे ?
सावल्या घनदाट अंधारातही दिसतात का रे ?


करपल्या शेतात विहीरी कोरड्या पडल्या तरिही,
संयमाने ते जमीनी आमुच्या कसतात का रे ?


जीवघेणे दु:ख काही जाहले दिसते तयांना ,
आज वेड्यासारखे ,ते  सारखे हसतात का रे ?


तोच मासेमार आणि ओळखीचे तेच जाळे ,
जाणता परिणाम, मासे नेमके फसतात का रे ?


पाठ जुळलेल्या जुळ्यांच्यासारखे जन्मास येता ,
सॉख्य आणि दु:ख इतके वेगळे दिसतात का रे ?


-शॅलेश. 

गझल: 

प्रतिसाद

गझल मस्तच आहे शैलेश.
त्यातही मतला तर फार फार आवडला!!

पाठ जुळलेल्या जुळ्यांच्यासारखे जन्मास येता ,
सॉख्य आणि दु:ख इतके वेगळे दिसतात का रे ?

जीवघेणे दु:ख काही जाहले दिसते तयांना ,
आज वेड्यासारखे ,ते  सारखे हसतात का रे ?

वावावा! फारच सुंदर शेर. गझलही एकंदर सहज झाली आहे. आवडली. माशांचा शेरही चांगला आहे.
मला मतल्याच्या दोन ओळींचा परस्परसंबंध नीटसा कळला नाही;त्यामुळे शेर जरा अस्पष्ट वाटला. चू.भू.द्या.घ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

करपल्या शेतात विहीरी कोरड्या पडल्या तरिही,
संयमाने ते जमीनी आमुच्या कसतात का रे ?

सुंदर शेर...


अविश्वसनीय गझल. Each stanza touching. Please load more.
आपल्याकडे वेगळे विषय आहेत याचा फार आनंद झाला.