... किती लाचार व्हावे ?

....................................................
... किती लाचार व्हावे ?
....................................................

वाटते आता मला की, मी शहाणा फार व्हावे !
अन्यथा समजू नये काहीच, वेडा ठार व्हावे !!

घेतली माझ्या शिरी मी एवढी ओझी कुणाची ?
का असे आयुष्य हे माझे मलाही भार व्हावे  ? 

तुज स्मरावे ज्या क्षणी मी त्या क्षणी येशी पुढे तू...
हेच वारंवार झाले...हेच वारंवार व्हावे !!
 
लाभली आहेत सर्वांना घरे शांती, सुखाची...
हिंडणे माझेच का अद्याप दारोदार व्हावे ?

टांगणीला जीव हा लागू नये माझा, तुझाही...
फैसला होऊन जावा...आर किंवा पार व्हावे !

थेंब चुंबाया दवाचा तू कसा येशील खाली ?
स्वप्न आभाळा तुझे रे हे कसे साकार व्हावे ?

तोल जाणाऱ्यास द्यावा हात, सोबत चालताना...
- अन् निराधारास एखाद्या तरी आधार व्हावे !

हे असे कित्येकदा माझ्याच वेळी होत गेले...
उंबऱ्याशी पोचलो की बंद तेव्हा दार व्हावे !

तू सतारीसारखी; पण तुज गवसणी घातलेली...
- आणि माझी आस ही की, मी तुझा झंकार व्हावे !

वाहण्यापेक्षा कुठेही राख व्हावे स्वप्न माझे...
आसवांनी यापुढे आता तरी अंगार व्हावे !

चामडी देई सुखे; पण प्रश्न हाही व्यर्थ नाही...
माणसाने चामडीसाठी किती लाचार व्हावे ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

प्रदीपजी क्या बात है.इतके सारे सुंदर शेर की एकाचा उल्लेख म्हणजे दुसर्‍यावर अन्याय. सारेच शेर मस्त जमलेले आहेत्,तरीही राहवत नाही म्हणून काही शेरांचा जिक्र.
थेंब चुंबाया दवाचा तू कसा येशील खाली ?
स्वप्न आभाळा तुझे रे हे कसे साकार व्हावे ?

तू सतारीसारखी; पण तुज गवसणी घातलेली...
- आणि माझी आस ही की, मी तुझा झंकार व्हावे !

चामडी देई सुखे; पण प्रश्न हाही व्यर्थ नाही...
माणसाने चामडीसाठी किती लाचार व्हावे ?

प्रमोदरावांशी सहमत.

तू सतारीसारखी; पण तुज गवसणी घातलेली...
- आणि माझी आस ही की, मी तुझा झंकार व्हावे !

ही द्विपदी विशेष आवडली.

अव्वल. नेहमीप्रमाणे.

गझलच अप्रतिम!
सतारीचा आणि चामडीचा शेर मनात रेंगाळणारा...

टांगणीला जीव हा लागू नये माझा, तुझाही...
फैसला होऊन जावा...आर किंवा पार व्हावे !

तू सतारीसारखी; पण तुज गवसणी घातलेली...
- आणि माझी आस ही की, मी तुझा झंकार व्हावे !

- हे शेर जगातल्या प्रत्येकाचे आत्मकथन आहेत- बापू

अप्रतिम गझल आहे.
सर्वच शेर अप्रतिम आहेत.
घेतली माझ्या शिरी मी एवढी ओझी कुणाची ?
का असे आयुष्य हे माझे मलाही भार व्हावे  ? 

तुज स्मरावे ज्या क्षणी मी त्या क्षणी येशी पुढे तू...
हेच वारंवार झाले...हेच वारंवार व्हावे !!

थेंब चुंबाया दवाचा तू कसा येशील खाली ?
स्वप्न आभाळा तुझे रे हे कसे साकार व्हावे ?

हे शेर मला विशेष आवडले.

चामडी देई सुखे; पण प्रश्न हाही व्यर्थ नाही...
माणसाने चामडीसाठी किती लाचार व्हावे ?

क्या बात है !!

वरील शेर मान्य आहेत!

सर्वच सुंदर आहे. पण मला विशेषकरून हे भावले.
तोल जाणाऱ्यास द्यावा हात, सोबत चालताना...
- अन् निराधारास एखाद्या तरी आधार व्हावे !

मस्त  आशय....

चामडी देई सुखे; पण प्रश्न हाही व्यर्थ नाही...
माणसाने चामडीसाठी किती लाचार व्हावे ?

प्रदीपराव,
नेहमीप्रमाणेच अप्रतिम गझल.

मात्र खालील शेर फारच आवडले.
हे असे कित्येकदा माझ्याच वेळी होत गेले...
उंबऱ्याशी पोचलो की बंद तेव्हा दार व्हावे !

चामडी देई सुखे; पण प्रश्न हाही व्यर्थ नाही...
माणसाने चामडीसाठी किती लाचार व्हावे ?

आपला,
(निवडक) आजानुकर्ण

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार...लोभ आहेच; असाच राहू द्यावा...