धिटाई

कितींदा तुझी ही नभाशी लढाई,
मनाची मनाशी कशाला चढाई
 
खरे रूप झाकून शालीन माती,
भुकंपात का ती निघावी शिलाई?
 
मिळावी सुखे देणगीसारखी ती!
कुणी राखली संचिताची कमाई?
 
चुका टाळुनी वाट शोधेल आता,
कलीने अशी ह्यास द्यावी ढिलाई?
 
किती चाळशी, फाडशी कागदांना,
किती दाम तूझे? फुकाची बढाई!
 
जळावे अजूनी जरी राख आहे,
असे बोलते या शवाची धिटाई!

- निलेश सकपाळ

गझल: