...मी खरा की तू खरा ?

........................................
...मी खरा की तू खरा ?
........................................

भास मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ?
ही पुरे झाली हुशारी - मी खरा की तू खरा ?

मध्यरात्री काल मी जे दुःख स्वप्नी सोसले...
आज ते म्हणते दुपारी - मी खरा की तू खरा ?

उत्तराची भीक नाही घालता आली मला...
प्रश्न आला तोच दारी - मी खरा की तू खरा ?

शेवटी झोळीच ती ! माझ्याहुनी मोठी जरा...
मी भिकारी; तू भिकारी - मी खरा की तू खरा ?

दोन सत्ता, दोन हत्ती...याचसाठी झुंजती
याचसाठी साठमारी - मी खरा की तू खरा ?

तोतया होऊन माझा राहशी माझ्या घरी....
व्हायची खानेसुमारी - मी खरा की तू खरा !

वगळ तू सोईप्रमाणे जे तुला वगळायचे...
गोष्ट ही सांगेल सारी - मी खरा की तू खरा !

कोण जाणे आरशाला एवढा का लागला -
- प्रश्न हा माझा जिव्हारी - मी खरा की तू खरा ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

वेगळीच कल्पना, नेहमीप्रमाणे सुरेख गझल!

कोण जाणे आरशाला एवढा का लागला -
- प्रश्न हा माझा जिव्हारी - मी खरा की तू खरा ? वा !

हा शेर फार आवडला.

उत्तराची भीक नाही घालता आली मला...
प्रश्न आला तोच दारी - मी खरा की तू खरा ?

वगळ तू सोईप्रमाणे जे तुला वगळायचे...
गोष्ट ही सांगेल सारी - मी खरा की तू खरा !

कोण जाणे आरशाला एवढा का लागला -
- प्रश्न हा माझा जिव्हारी - मी खरा की तू खरा ?

मस्तच!
- चक्रपाणि जीवन चिटणीस

शेवटी झोळीच ती ! माझ्याहुनी मोठी जरा...
मी भिकारी; तू भिकारी - मी खरा की तू खरा ?
वा!

वगळ तू सोईप्रमाणे जे तुला वगळायचे...
गोष्ट ही सांगेल सारी - मी खरा की तू खरा !
वा!

कोण जाणे आरशाला एवढा का लागला -
- प्रश्न हा माझा जिव्हारी - मी खरा की तू खरा ?
वा!

नेहमीप्रमाणे सुरेख गझल.

विषयाचं वेगळेपण,शब्दांचा टवटवीतपणा नेहमीसारखाच या कवितेतही.या कवीला इतकं सुंदर आणि इतक्या प्रमाणात कसं सुचतं याचं नेहमीच वाटणारं कौतुक या गझलनंतरही.फारच सुंदर.

आरसा आणि झोळी हे शेर फार आवडले प्रदीपराव!

आरसा आणि प्रश्न हे शेर आवडले!!

  कोण जाणे आरशाला एवढा का लागला -
- प्रश्न हा माझा जिव्हारी - मी खरा की तू खरा ? वा !

_ गझल आवड्ली