ताकीद


येथेच सप्तरंगी पिशव्यांत रक्त मिळते
तुकड्यांत वाटलेले आकाश फक्त मिळते


खांद्यावरी स्वत:च्या पेलेल स्वर्ग- त्याला
नरकात राहण्याची ताकीद सक्त मिळते


पंखांत वीज त्यांच्या, बेफाम अन भरारी
पण त्या गरुडपिलांना, घरटे विभक्त मिळते


सारेच राम त्यांनी, बेडीत बंद केले
आता न रावणांना, आव्हान शक्त मिळते


घाणीत पाय का तो ठेवीत येत नाही
नक्कीच ईश्वराला, कित्येक भक्त मिळते


 

गझल: 

प्रतिसाद

घाणीत पाय का तो ठेवीत येत नाही
नक्कीच ईश्वराला, कित्येक भक्त मिळते
उत्तम...!

'मिळते' हा काफिया चांगला आला आहे. शेवटचा शेर फारचा चांगला आहे.
घाणीत पाय का तो ठेवीत येत नाही
नक्कीच ईश्वराला, कित्येक भक्त मिळते

वावा!वा!
तुकड्यांत वाटलेले आकाश फक्त मिळते
नरकात राहण्याची ताकीद सक्त मिळते
ह्या ओळी आवडल्या. अनेक शेर स्पष्ट होत नाहीत, कवीला काय म्हणायचे आहे ते धूसर आहे, असे वाटते.
 
 

२ व ४ आवडले. मतला कळला नाही. "कित्येक भक्त मिळते" वर अडखळलो. 'मिळती' असायला हवे का? कोणी ह्याचं व्याकरण समजावेल का मला?

´मिळाले असते´ ह्या अर्थाने ´मिळते´ आले आहे. हा वापर आजकाल कमी झाला आहे. पण अगदी योग्य आहे.