राज्य दुःखाचे...

.....................
राज्य दुःखाचे...
.....................


फुलांची फार झाली कौतुके !
कधीपासूनचे काटे मुके !


सुखे आहेत; दुःखेही तशी...
कधी ओले;कधी आहे सुके !


सुटे ती...पोचण्याआधीच मी
- अशी माझीच का गाडी हुके ?


पहाटेचीच त्याला ओढ का ?
पहाटेलाच का वेढी धुके ?


तिथे तो...तूच तू आहेस का ?
तिथे जो दूर तारा लुकलुके ?


उभे आयुष्य द्यावे लागले...
मिळाले  अर्थ का कविते, फुके ?


पुन्हा स्वप्नात आली भाकरी..
कुणी माझ्यातले मेले भुके !


कधी मी एकदा चुकलो जरा...
स्मरे ती चूक अन् मी चुकचुके !


कधी  शिकलास माणुसकी अशी ?
कधी  शिकलास तू इतकी बुके ?


तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !


क्षमा मागायची का ? मागतो !
तुझे कोठे ? अरे, माझे चुके !!


तुझे ऐकेन मी काही कसे ?
जरी हाती तुझ्या हे दंडुके !


किती हे राज्य दुःखाचे बडे...
किती आहेत जिल्हे; तालुके !!


- प्रदीप कुलकर्णी


 

गझल: 

प्रतिसाद

प्रदीप,
तुझ्या उत्तुंग प्रतिभेला दंडवत!
कधी  शिकलास 'गझल'की अशी ?
कधी  शिकलास तू लिहणे नेमके?

जयन्ता५२

सुखे आहेत; दुःखेही तशी...
कधी ओले;कधी आहे सुके !
वाव्वा!!

तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !
वाव्वा!!

गझल सुरेख आहे.

फुलांची फार झाली कौतुके !
कधीपासूनचे काटे मुके !

अप्रतिम...!!!

चुकचुके, ओले-सुके, डहाळी आणि दु:खाचे राज्य शेर फार आवडले!!

समस्त काफिये आवडलेत...

पुन्हा स्वप्नात आली भाकरी..
कुणी माझ्यातले मेले भुके !

तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !.. मस्तच

-मानस६

क्षमा मागायची का ? मागतो !
तुझे कोठे ? अरे, माझे चुके !!
वा! गझल आवडली. काट्याचा शेरही मस्त.

खूप आवडली.
 

हा शेर काय येऊन गेलाय!सहजसुंदर!
वा..वा!

तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !   हा शेर खास :  बापू

काही शेर मुद्दाम लिहिल्यासारखे वाटतात जसे दंडुके, भुके, लुकलुके.. पण डहाळी आणि तालुक्यांचे शेर मात्र खास!