बासरी नादावली रे...

भावभोळी भक्ति माझी राधिकेला भावली रे
आज कान्हाच्या कृपेची बासरी नादावली रे...

देव आहे बापआई पोरक्या जीवास माझ्या,
ऐकुनी आकांत वेडा, माउली ती धावली रे...

मानसीच्या शिंपल्याचे मोहमोती साठलेले,
माळ त्यांची अर्पिण्याला त्यागसूत्रे ओवली रे...

या जगाशी झुंजताना ताप होतो अंतरी या,
सर्व कष्टातून काढी आज त्याची सावली रे...

त्यास ठावे काय माझा पुण्यसाठा संचिताचा
तोकडी माझी तपस्या, नाम घेता पावली रे...

अर्पिण्या देवास काही आगळे माझे असे ना,
ग्रास घे सर्वस्व माझे, माय प्रेमे जेवली रे...

आज माझी प्रेमवल्ली पुष्प देई भावनांचे
त्या सुवासाची धुमारी आसमंती मावली रे...

-- स्वामी निश्चलानन्द

(व्योमगंगा - गालगागा गालगागा गालगागा गालगागा)

गझल: 

प्रतिसाद

या जगाशी झुंजताना ताप होतो अंतरी या,
सर्व कष्टातून काढी आज त्याची सावली रे...
त्यास ठावे काय माझा पुण्यसाठा संचिताचा
तोकडी माझी तपस्या, नाम घेता पावली रे...
आज माझी प्रेमवल्ली पुष्प देई भावनांचे
त्या सुवासाची धुमारी आसमंती मावली रे...

कलोअ चूभूद्याघ्या

वा स्वामी वा!
मजा आली. काय सुंदर रचना! 'त्यागसूत्रे' मधे 'सू' मुद्दाम दीर्घ केलाय व्योमगंगा नीट वहात रहावी म्हणुन का चुकून झालाय?
असो.
आपल्या दृष्टीने गझल म्हणजे काय आहे काय हो? ऑ?
घेतला काफिया, टाकली रदीफ, लावली अलामत, घातले वृत्तात अन फेकली रचना!
काहीही करा! मला काय करायचंय?
अजय,
किती खालच्या पानावरच्या भजनांना वर घेऊन येतोस तू? हे म्हणजे जवळचे नातेवाईक गावाहून आले की मृताच्या घरचे, दु:ख परत काढुन काढुन रडतात तसे वाटते! हो की नाही?
 

वैयक्तिक पातळीवर कुणालाही बोलू नका.
जवळचे नातेवाईक गावाहून आले की मृताच्या घरचे, दु:ख परत काढुन काढुन रडतात तसे वाटते!
खरेतर ही टीकाच आहे. याचा गझलेशी संबंध काय? गझल पटली नसेल तर तसे स्पष्ट लिहा की! कोणी अडवलंय?
मी कोणाला वर आणण्याचा प्रश्नच येत नाही.  हे संकेत स्थळ पाहताना एक एक गोष्ट आपण पहात जातो. सगळ्या वेळी सर्वांना प्रतिसाद देता येत नाहीत. मला आवडलेल्या ओळी मी दिल्या. यात काय चूक?
आणखी एक 'त्यागसूत्रे' हा शब्द 'ब्रह्मसूत्र' यासारखाच आहे. त्यातील 'सू' दीर्घच असावा.
तोकडी माझी तपस्या, नाम घेता पावली रे...
ही ओळ मला तरी योग्य वाटली.
केवळ देव आला म्हणून काय ती गझल नाही?
कलोअ चूभूद्याघ्या