चालणे टाळायचे का?

ऊन्ह तापे रे दुपारी, चालणे टाळायचे का,
फूल कोमेजून गेले, ते तरी माळायचे का?

धान्य कोठारात नासे, पोखरूनी कीड लागे,
हाय, पैसा वाचवाया जोंधळे चाळायचे का?

वाघबच्चा अंगणी ये, वाट त्याला सापडेना,
जीव लावाया दयेने पोसुनी पाळायचे का?

चूल पेटेना कशीही, लाकडे ओली म्हणूनी,
चंदनाचे खोड आहे कोरडे, जाळायचे का?

कोण मोठा धाकटा रे, शिक्षणाने वा पदाने,
मोल पैशाने करूनी माणसा टाळायचे का?

लौकिकाचा मोह वेडा, या जगाला जिंकण्याचा,
दैव नाही साथ द्याया, खंगुनी वाळायचे का?

देव भावाचा भुकेला, त्यास प्रेमाने भजावे,
उग्र कष्टाने तनूला वावगे पोळायचे का?

.... स्वामी निश्चलानन्द

(व्योमगंगा - गालगागा गालगागा गालगागा गालगागा)

गझल: 

प्रतिसाद

सुंदर आहे रचना. प्रश्नांमधे मांडणी केल्याने अंतर्मुख करते आहे.
'चंदन', 'खंगुनी वाळायचे' आणि 'देव भावाचा भुकेला' या द्विपदी मनापासून आवडल्या.
-सतीश

चूल पेटेना कशीही, लाकडे ओली म्हणूनी,
चंदनाचे खोड आहे कोरडे, जाळायचे का?

कोण मोठा धाकटा रे, शिक्षणाने वा पदाने,
मोल पैशाने करूनी माणसा टाळायचे का?

लौकिकाचा मोह वेडा, या जगाला जिंकण्याचा,
दैव नाही साथ द्याया, खंगुनी वाळायचे का?

देव भावाचा भुकेला, त्यास प्रेमाने भजावे,
उग्र कष्टाने तनूला वावगे पोळायचे का?
कलोअ चूभूद्याघ्या

स्वामी?
अक्षरशः मुळीच म्हणजे काय वाट्टेल ते झाले तरी असे करू नये.
हे काय हे? अहो, शिंप्याकडे जाऊन केस कापुन देण्याची मागणी करणे किंवा धोब्याला ईडली केवढ्याला आहे असे विचारणे हे बरोबर आहे का?
ही साईट गझलसाठी आहे की नाही? मग गझल का नाही बरे सादर करीत आपण?
एक तर दुसर्‍या शेरातील 'पोखरुनी' मधे 'व्योमगंगा' व्योमातून गंगेला मिळाल्यासारखे' वाटत आहे. तसेच 'मोल पैशाने करूनी' मधे पण! पण ते जाऊदे. पण मतल्याच्या पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीशी काही सुतराम संबंध आहे का? ऑ?
अध्यात्ममार्गातील वाटचालीत कधी वेळ मिळाला तर वाघबच्चा, चंदन वगैरे शेरांचा संदर्भ कळवा. आपल्याला मोक्षासाठी शुभेच्छा!