किंमत

कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला


प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागली ती कारणे शोधायला

मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला


काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला


बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला


हो मला म्हटलेस तू कविते जसे
मी खुळ्यागत लागलो वागायला

भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला


माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला

गझल: 

प्रतिसाद

'बंद केले उमलायचे', 'आसवे लागली माजायला', आणि 'भूक' हे शेरही सुंदर!
-सतीश

किंमत आणि आसवे हे शेर अप्रतिम आहेत!!
आसवे ही लागली माजायला -- क्या बात है!

जोरदार गझल...
दिसायला साधी-सोपी; सुचायला अवघड, कळायला  सुगम...गझलेत अशी किमया खूप कमीजणांना साध्य होते.
शुभेच्छा, अनिरुद्ध.

काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
व्वा ! थेट ं  मीरच्या  वळणाचा शेर आहे..असे शेर अस्वस्थ करून जातात..

काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
व्वा ! थेट ं  मीरच्या  वळणाचा शेर आहे..असे शेर अस्वस्थ करून जातात..

आवडला.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

अभंकर साहेब,
माफ करा. गझल चांगली आहे. पण बहुतेक माझीच अभिरुची खास नसावी.