गझलमाळले केसात तुझिया गंध ज्यांचे
कोण जाणे काय झाले त्या फुलांचे


काल फुललो बहर झालो बहाव्याचा
आज आहे झाड वठले आसवांचे


भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?


झगमगाटाला भुलूनी धावले जे
मागचे हरवून गेले गाव त्यांचे


त्याच त्या कुरवाळुनी कंटाळलो मी
दे  अता   पत्ते   नवे   तू   वेदनांचे


सोयर्‍यांनी माझिया जे धाडलेले
नाव मागू मी कशाला गारद्यांचे ?


पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे

गझल: 

प्रतिसाद

पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
हा शेर फार आवडला!!!!

भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
दोन्हीही  कल्पना छान....
तंत्रशुद्ध गझल लिहिण्यासाठी मनापासून शुभेच्छा.
 
 
 

मूळचे ...
भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?

भे  ट  ल्या  हा  ता  त  गुं  फू    हा  त  हो  त्या
 २  १   २   २   २   १   २   २  १   २  १   २   २     = २२
प्रे  म  कां  ते  फक् त  हो  ते  सा  व  ल्यां  चे
 २  १   २   २   २   १   २   २  २   १   २    २       =  २१
मला वाटते असे असेल..
भेटल्या हातात गुंफुन हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?  वा वा.
बाकी छानच.
कलोअ चूभूद्याघ्या

पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे

पहिली ओळ परत लिहिलीत तर शेर अजून चांगला होईल, असे वाटते.
तसे दुस-या ओळीत मीटर पहायला हवे...

सावल्या, गाव  आणि पत्ते  हे  शेर जास्त आवडले.
हे  मंजुघोषा  असेल  तर- "काठ झाले कधी ओले पापण्यांचे..." हे  वाचतांना अडखळते  आहे.(मला तरी)
 
 

उपरा,
असे करू नये. गझल छानच झालीय. पण वृत्तास कुठेही सोडू नये.
तिलकधारीच्या मनापासून शुभेच्छा!

भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?

त्याच त्या कुरवाळुनी कंटाळलो मी
दे  अता   पत्ते   नवे   तू   वेदनांचे.. हे दोन्ही शेर आवडलेत
-मानस६


फारच  छान.....
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे

पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
छानच  शेर  आहे.

सुंदर कल्पना आहेत या गझलेमधे. झगमगटाला भुलून जाणे हा शेर फार आवडला.