विराणी

अजून ऐकू तिला न येई तुझे तराणे, तुझी कहाणी
भरून आहे तिच्या कदाचित अजून कानी जुनी विराणी

अजून त्याच्याच चेहऱ्याची करे प्रतीक्षा नयननिरांजन
अजून डोळ्यांत आठवांचे विटाळलेले गढूळ पाणी

म्हणायला राहिलीत मागे कुंवारतेची फुलं सुगंधी
फळाफळातून वेल गाते दुरावल्या प्रीतिचीच गाणी

जरी कधीची विरून गेली धुक्यात ती आकृती सख्याची
अजून स्वप्नात स्पष्ट दिसते छबी तयाची उदासवाणी

विषाद याचा मला नसे की नकार उमटे तिच्या मुखातुन
उरेल आजन्म दु:ख हे की कडाडली, हाय, शापवाणी

असेल हातात सोमप्याला, स्मरेल खय्यामची रुबाई
नसेल विरहात सोबतीला तयापरी सुंदरी इराणी

तिच्या मनी का 'मिलिंद' प्रीती तुझ्यामुळे अंकुरे नव्याने ?
करून गेली तुला भस्म ती जसे मन्मथा पिनाकपाणी

गझल: 

प्रतिसाद

अजून ऐकू तिला न येई तुझे तराणे, तुझी कहाणी
भरून आहे तिच्या कदाचित अजून कानी जुनी विराणी
खालच्या ओळीतला शब्दक्रम बदलला तर अजून स्पष्ट होईलसे वाटते.
 'अजून कानी तिच्या कदाचित भरून आहे जुनी विराणी'  असे केल्यास अजूनची मजा वाढेल आणि कदाचित ओळ अधिक प्रवाही होऊ शकेल, हे माझे मत. हीच गोष्ट इतर काही ओळींबाबतही वाटते.शेर छान!
जरी कधीची विरून गेली धुक्यात ती आकृती सख्याची
अजून स्वप्नात स्पष्ट दिसते छबी तयाची उदासवाणी
वाव्वा.
अजून त्याच्याच चेहऱ्याची करे प्रतीक्षा नयननिरांजन

अजून डोळ्यांत आठवांचे विटाळलेले गढूळ पाणी

वावावा. नयननिरांजना ऐवजी दुसरे काही शक्य आहे काय? मिलिंद गझल चांगली आहे. पण मराठी प्रतीके, प्रतिमा वापरून बघता येतील
काय? अनेकदा कल्पना शब्दांच्या चिमटीत येत नाहीत, हे खरे. त्यांना अगदी थांबून, निवांतपणे चिमटीत पकडण्याच्या प्रक्रियेत असली फ़न
(इंग्रजी आणि उर्दू दोन्ही) आहे, हा माझा अनुभव.

वा मिलिन्दपंत,
अवघड अक्षरगणवृत्त असूनही गझल अगदी सहज आहे.
असेल हातात सोमप्याला, स्मरेल खय्यामची रुबाई
नसेल विरहात सोबतीला तयापरी सुंदरी इराणी...
सुंदर!!!
- कुमार
ता. क. गझल सुंदर आहे; पण एक-दोन मतं
(१) 'पिनाकपाणि'मधे 'णि' र्‍हस्व हवा असं मला वाटतं. पाणि (हात) हा शब्द मराठीतही माझ्या माहितीप्रमाणे र्‍हस्व वापरतात.
(२) तसंच आठवांचं पाणी विटाळलेलं का?

गझल सुंदर, प्रतिसाद दर्दींचे!
वा,वाचून शिकायला मिळाले.

गझल आवडली. मतल्यातल्या खालच्या ओळीबद्दल चित्तरंजनांचे म्हणणे पटले. यादगारांनी निर्देश केलेल्या ओळीतील मात्रांमुळे गेयतेत अडचण येते आहे. गझलेतील कल्पना आवडल्या. उदासवाणी छबी आणि विटाळलेले गढूळ पाणी यामधली सहजता बाकीच्या मिसर्‍यांमध्येही बघायला आवडेल.
कुमार, तत्सम र्‍ह्स्वान्त शब्द मराठीत दीर्घ लिहिले जातात/तसे लिहिले तर चालतात, असे वाटते. चक्रपाणि, पिनाकपाणि, शारंगपाणि, वज्रपाणि इ. च्या बाबतीत असे म्हणता येईल. पण मी स्वतः ते तसे लिहीत नाही ('णि' र्‍हस्वच लिहितो)

अभिप्राय व सुचना दिल्याबद्दल मी तुम्हा सार्‍यांचा अत्यंत आभारी आहे. यातच ह्या संकेतस्थळाचे वेगळेपण दिसून येते. इतर ठिकाणी निव्वळ "व्वा,व्वा" किंवा "जमली नाही" अशा येणार्‍या प्रतिसादांपेक्षा अशी साधक-बाधक टीका लिहिणार्‍याला खूप कही शिकवून जाते.

यादगारने सुचवलेला बदल चांगला असला तरी मला त्या ओळीत 'कानी' हा शब्द हवाच आहे. चित्तरंजनाने सुचवलेला 'अजून कानी तिच्या कदाचित भरून आहे जुनी विराणी'  हा बदल पटला. त्याने 'अजून' अधिक प्रभावी होत आहे.

'नयननिरांजन' हा मी विचारपूर्वक केलेला शब्दप्रयोग आहे. आपल्या डोळ्याची निरांजनं करून प्रियकराला ओवाळण्यासाठी तडफडणारी विरहिणी यातून चित्रित करायची आहे. हे अधिक समर्पकरित्या दर्शवणारा एखादा शब्द कोणी सुचवल्यास आनंदाने स्वीकारीन.

'प्रीतिचीच' व 'पिनाकपाणि/णी' विषयी :
ह्या मुद्द्याविषयी व्याकरणाच्या पुस्तकातील दोन नियम मला महत्त्वाचे वाटतात
 
१)कवितेमध्ये ऱ्हस्व-दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार ऱ्हस्व-दीर्घ लिहावेत.

२)व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे शब्द (संस्कृतातून मराठीत जसेच्या तसे आलेले) जरी मुळात ऱ्हस्वांत असले तरी ते मराठीत दीर्घांत लिहावेत.उदा.- हरी, अन्योक्ती, अतिथी, विभक्ती, संधी,कुलगुरू, इत्यादी.

संदर्भ :'सुगम मराठी व्याकरण-लेखन', लेखक - कै. मो. रा. वाळिंबे

या गझलेत 'णी' काफ़ियामुळे पिनाकपाणि ऐवजी पिनाकपाणी लिहिणं अनिवार्य होतं. वरील नियम क्रमांक (१) नुसार वृत्तबद्ध पद्यात ऱ्हस्व-दीर्घाच्या अशा तडजोडी चालतात. तसेच नियम क्रमांक (२) नुसार 'पाणि' चं 'पाणी' करायला हवं असं मला वाटतं.

अनेकदा कल्पना शब्दांच्या चिमटीत येत नाहीत, हे खरे. त्यांना अगदी थांबून, निवांतपणे चिमटीत पकडण्याच्या प्रक्रियेत असली फ़न

(इंग्रजी आणि उर्दू दोन्ही) आहे


Even when poetry has a meaning, as it usually has, it may be
inadvisable to draw it out.... Perfect understanding will sometimes
almost extinguish pleasure.  ~A.E. Housman


A poet dares be just so clear and no clearer.... He unzips the veil
from beauty, but does not remove it.  A poet utterly clear is a trifle
glaring.  ~E.B. White